Lok Sabha : शरद पवार तुम्ही माफी मागितलीच पाहिजे; अमरावतीच्या सभेतून देवेंद्र फडणवीस बरसले

Lok Sabha : शरद पवार तुम्ही माफी मागितलीच पाहिजे; अमरावतीच्या सभेतून देवेंद्र फडणवीस बरसले

अमरावती : महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी अमरावती येथे प्रचारासाठी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांचे नाव न घेता टीका केली होती. तसेच पाच वर्षांपूर्वी झालेल्या चुकीबद्दल त्यांनी माफी मागितली होती. यानंतर आज महायुतीच्या अमरावतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचाराच्या निमित्ताने अमरावतीत सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. इतके वर्ष राजकारण केलं, पण विदर्भाला काही दिलं नाही, याबद्दल तुम्ही (शरद पवार) माफी मागितलीच पाहिजे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. (Lok Sabha Election 2024 Sharad Pawar you must apologize Devendra Fadnavis)

नवनीत राणा यांच्या प्रचाराच्या आयोजित सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी अमरावतीचा भाचा आहे. माझी आई, माझे मामा अमरावतीचे आहेत. त्यामुळे माझ्याकरता ही भूमी महत्त्वाची आहे. माझ जेवढं प्रेम नागपूरवर आहे, तेवढंच प्रेम अमरावतीवर आहे. त्यामुळे आज आम्ही अमरावतीत खासदार नवनीत राणा यांना निवडून आणण्याकरता सर्वजण एकत्र आलो आहोत. मी निश्चितपणे हे म्हणू शकतो की, आजपर्यंतच्या अमरावतीच्या इतिहासात सगळ्यात मोठी सभा ही आज होते आहे. तुमची उपस्थिती ही निश्चितपणे सांगते आहे की, नवनीत राणा या प्रचंड मताने निवडून येणार आहेत, असा विश्वास व्यक्त करत देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला.

हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : भोवळ आल्यानंतरही नितीन गडकरींचे जोरदार भाषण

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ही निवडणूक साधी निवडणूक नाही. ही निवडणूक देशाची आहे. त्यामुळे हा देश कुणाच्या हाती द्यायचा, याचा फैसला करायचा ही निवडणूक आहे. एकीकडे विश्वगौरव नरेंद्र मोदी आहेत, तर दुसरीकडे राहुल गांधी आहेत, त्यामुळे तुम्हाला फैसला करायचा आहे. मोदींसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, रामदास आठवले यांची रिपाईं, कवाडे यांचा पक्ष, जानकरांची रासप, राज ठाकरेंची मनसे आणि वेगवेगळे पक्ष सोबत येऊन आपली महायुती आहे. पण दुसरीकडे राहुल गांधींची 26 पक्षांची खिचडी आहे आणि राहुल गांधींना त्यांच्या खिचडीचे लोक देखील नेता मानायला तयार नाहीत, अशी खरमरीत टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

परवा कम्युनिस्ट पक्षाचे मुख्यमंत्री म्हणाले, राहुल गांधी हे अपरिपक्व आहेत. ते देशाचं नेतृत्व करू शकत नाहीत. खरं तर त्यांच्या आघाडीची अवस्था अशी आहे की, राहुल गांधी यांना नेता मानायला शरद पवार आणि उद्धव ठाकरेही तयार नाहीत. आता तर एकाने (संजय राऊत) घोषित करून टाकलं आहे की, देशाचे पंतप्रधान उद्धव ठाकरे होणार आहेत. आता मला सांगा, ज्यांची एकही व्यक्ती निवडून येऊ शकत नाहीत ते देशाचे पंतप्रधान होऊ शकतात का? ज्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले, त्या उद्धव ठाकरेंसोबत कुणी जाईल का? कुणीच जाणार नाही, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला.

हेही वाचा – Lok Sabha : मोदींनी अब्जाधीश बनवले, आम्ही कोट्यवधी लखपती घडवणार; राहुल गांधींकडून घोषणा

शरद पवार तुम्ही माफी मागितलीच पाहिजे (Sharad Pawar you must apologize)

शरद पवारांवर निशाणा साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, परवा शरद पवार याठिकाणी आले होते. तेव्हा ते म्हणाले की, मागच्या वेळेस नवनीत राणा यांना पाठिंबा दिल्याबद्दल मी माफी मागतो. पण त्यांना माफी मागायची असेल तर त्यांनी विदर्भाची मागावी. कारण त्यांनी सातत्याने विदर्भावर, अमरावतीवर अन्याय केला आहे. त्यांनी सातत्याने विदर्भाला मागास ठेवलं आहे. परंतु मोदींच्या नेतृत्वात आज या ठिकाणी टेक्सटाईल पार्क आलं. मोदींच्या नेतृत्वात रेल्वे स्टेशन सौंदर्यकरण आलं. मोदींच्या नेतृत्वात या ठिकाणी अनेक गोष्टी आल्या. पण शरद पवार यांनी विदर्भात इतके वर्ष राजकारण केलं, पण काही दिलं नाही, यासाठी त्यांनी जनेतेची माफी मागितलीच पाहिजे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

शरद पवार काय म्हणाले? (What did Sharad Pawar say?)

शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी अमरावती येथे भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांचे नाव न घेता टीका केली होती. पाच वर्षांपूर्वी मी इथे अपक्ष खासदाराला पाठिंबा दिला, त्या खासदारासाठी मी मते मागितली, पण त्यावेळी माझ्याकडून चूक झाली होती आणि त्यासाठी मी आज माफी मागतो, असे शरद पवार यांनी म्हटले होते. याप्रकरणी आता देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

हेही वाचा – Lok Sabha 2024: उद्धव ठाकरेंनी गमावलं ते शिंदेंनी जपलं; बाळासाहेबांचा उल्लेख करत शहांचा हल्लाबोल

Edited By – Rohit Patil

First Published on: April 24, 2024 6:33 PM
Exit mobile version