Lok Sabha 2024 : मधल्या काळात गद्दारी झाली नसती तर…; उद्धव ठाकरेंचा महायुतीवर निशाणा

Lok Sabha 2024 : मधल्या काळात गद्दारी झाली नसती तर…; उद्धव ठाकरेंचा महायुतीवर निशाणा

नांदेड : पण मधल्या काळात जी गद्दारी झाली, ती गद्दारी झाली नसती तर हे सरकार महाराष्ट्राला खूप पुढे घेऊन गेले असते, असे म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्या समर्थनार्थ उद्धव ठाकरे यांनी नांदेडमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी राज्यातील महायुती आणि केंद्रातील मोदी सरकारसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. (Lok Sabha Election 2024 Shiv Sena Uddhav Thackeray Slams CM Eknath Shinde PM Narendra Modi In Nanded Press Conference)

“2019 साली देशात किंवा राज्यात सर्वप्रथम महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले होते. मी सर्वप्रथन म्हणालो कारण दोन टोकाचे असलेले शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले आणि त्यांनी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. त्या सरकारचे नेतृत्व माझ्या हाती होते. त्यावेळी अडीच वर्षात काँग्रेस, राष्ट्रवादीसह सर्वच मित्रपक्षांनी मला चांगले सहकार्य केले. पण मधल्या काळात जी गद्दारी झाली, ती गद्दारी झाली नसती तर हे सरकार महाराष्ट्राला खूप पुढे घेऊन गेले असते. याआधी आम्ही वेगवेगळे निवडणुका लढलो होतो. पण आता आम्ही तिन पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवत आहोत. त्यावेळी आमच्या सरकारमध्ये चांगला ताळमेळ होता. तसाच ताळमेळ निवडणुकीच्या प्रचारातही आम्हाला दिसतो आहे. सर्व घटक पक्ष आणि मित्र पक्ष हे महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकून आणण्यासाठी प्रचार करत आहेत. काही ठिकाणी काँग्रेसचा हात आहे, राष्ट्रवादीची तुतारी आहे, काही ठिकाणी शिवसेनेची मशाल आहे. हे तिनही चिन्ही आपले समजून सर्व कार्यकर्ते प्रचार करत आहेत. त्यामुळे अशी एकजूट पाहिल्यानंतर विजय हा निश्चित आहे”, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

शेतकऱ्यांच्या मनात सातबाऱ्यावरून नाव जाण्याची भीती – उद्धव ठाकरे

“देशात हुकूमशाहीच्या विरोधात एक लाट उसळली आहे. सगळ्यांच्या मनात भीती आहे की, हे घटना बदलतील, संविधान बदलतील. गेल्या काही दिवसांपासून त्यांची वाटचालही तशीच दिसते आहे. प्रचारादरम्यान मला अनेक शेतकरी भेटले. त्यावेळी त्यांनी सांगितले की यावेळी आमचे मत महाविकास आघाडीला आहे. शिवाय, महाविकास आघाडीने आम्हाला कर्जमुक्त केले. तसेच, सध्याचे जे मोदी सरकार आहे त्यांनी शिवसेनेच्या सातबाऱ्यावर गद्दारांची नावे लिहिली, तर उद्या पुन्हा त्यांचे सरकार आले तर आमच्या सातबारावर दुसऱ्याचं नाव लिहिलं तर आम्ही कुठे जायचं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नांदेडमध्ये सभा झाली. त्यावेळी शिवसेनेला नकली शिवसेना म्हणाले. पण आमच्या सातबाऱ्यावर दुसऱ्या कोणाचं नाव लिहिलं तर आम्ही काय करायचे? कुठे जायचं असे ते म्हणत होते. त्यामुळे हा बदलीचा धोका शेतकऱ्यामध्ये आहे. तुम्हाला नकली म्हणाले होते, उद्या आम्हालाही नकली शेतकरी म्हणतील”, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला.

“नुकताच सुरतमध्ये जादू झाली आणि भाजपचा उमेदवार बिनविरोध जिंकला. तर हे असेच जादू करत राहिले तर आम्ही आणि सर्वसामान्य माणूस कसा राहिल असाही सवाल शेतकऱ्यांना पडला आहे”, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

सुरक्षेचा खर्च कोणाचा? ठाकरेंचा सवाल

“घरात काम करणाऱ्यांना सुद्धा झेड प्लस आणि वाय प्लस सुरक्षा दिली जात आहे. पण सर्वसामान्यांची सुरक्षा वाऱ्यावर आहे. महिलांचीही सुरक्षा नाही. सलमान खानच्या घरावर गोळीबार होतो. त्यांचाच एक आमदार गणपत गायकवाड पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतो. त्यामुळे सुरक्षा वाऱ्यावर पडली आहे. सर्वसामान्यांना सुरक्षा नाही पण सोबत असलेल्या लोकांना कडेकोड बंदोबस्त दिला जात आहे. पण या सुरक्षेचा खर्च कोण करत हा देखील प्रश्न आहे. कारण लोकांकडून तुम्ही कर घेता गद्दारांना सुरक्षा देतात”, अशीही टीका उद्धव ठाकरे यांनी केली.


हेही वाचा – LOK SABHA 2024: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रात दोन सभा; पंतप्रधान मोदींच्या आरोपांना काय उत्तर देणार

Edited By – Vaibhav Patil

First Published on: April 24, 2024 11:31 AM
Exit mobile version