टीक टीक वाजते डोक्यात…

टीक टीक वाजते डोक्यात…

भाजपवासी रणजितसिंह पाटलांनी घड्याळासाठी मागितले मत

लोकसभा निवडणुकीत या पक्षातील नेते त्या पक्षात जाणे ,हे काय नवीन नाही. परंतु,एखाद्या पक्षात काही वर्षे काढल्यावर त्या पक्षाच्या नावाने अनेक प्रचारसभांमध्ये मतांचा जोगवा मागितला जातो. त्यामुळे त्यापक्षाची निशाणी या नेत्यांच्या तोंडवळणी पडलेली असते.

परंतु, हाच नेता जेव्हा दुसर्‍या पक्षात प्रवेश करतो तेव्हा त्याच्या कार्यालयातील झेंडे,फोटो सर्वकाही बदलून जाते.पण काही गोष्टी सहजासहजी जात नाही. त्यामुळे कधीकधी भर सभेत हसे व्हायची वेळ येते. त्याचे झाले असे की, राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवारांच्या सहवासात राहिलेल्या रणजितसिंह मोहिते-पाटलांच्या जिभेला ‘घड्याळ’ या शब्दाची इतकी सवय लागली की, भर प्रचार सभेत त्यांनी लोकांना घड्याळाला मत देण्याचे आवाहन केले. चूक लक्षात येताच त्यांनी उपस्थित लोकांची माफी मागितली.

शनिवारी माढ्याचे भाजप-सेना युतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारसभेसाठी रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सांगोला येथे सभा घेतली. या सभेत भाषणादरम्यान रणजितसिंह पाटील यांची बोलण्याच्या ओघात चूक झाली. भाषणाच्या ओघामध्ये रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी मतदारांना येत्या २३ एप्रिल रोजी घड्याळाला मत द्या असे म्हटले. मात्र चूक लक्षात येता त्यांनी चक्क हात जोडले आणि उपस्थितांची माफी मागितली.

रणजितसिंह मोहिते पाटील यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. प्रचारात बोलताना रणजितसिंह पाटील म्हणाले की, आपल्या पाण्याला ज्यांनी विरोध केला त्यांना आपण विरोध केलाच पाहिजे. ज्यांनी आपल्या पाण्याला पाठिंबा दिला आहे, जे भविष्यात आपल्या पाण्याचा प्रश्न सोडवणार आहेत, अशांच्या मागे आपण उभे राहिले पाहिजे. त्यामुळे येत्या २३ एप्रिल रोजी आपले घड्याळ हे चिन्ह अशी चूक केली. मात्र ही चूक लक्षात रणजितसिंह मोहिते पाटलांनी हात जोडले.

First Published on: April 15, 2019 4:31 AM
Exit mobile version