Lok Sabha : शाहू महाराजांमुळे वाद न घालता कोल्हापूरची जागा काँग्रेससाठी सोडली – संजय राऊत

Lok Sabha : शाहू महाराजांमुळे वाद न घालता कोल्हापूरची जागा काँग्रेससाठी सोडली – संजय राऊत

मुंबई : यंदा छत्रपती शाहू महाराजांचे नाव समोर आले आणि ते काँग्रेसच्या चिन्हावर लढणार हे समजल्यावर आम्ही त्यामध्ये कोणताही वादविवाद न करता कोल्हापूरची जागा आम्ही काँग्रेससाठी सोडली, असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी महाविकास आघाडीत तिढा नसल्याचे सांगितले. (lok sabha shiv sena sanjay raut kolhapur congress shahu maharaj)

महाविकास आघाडीतील सांगली आणि इशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा वाद चवाट्यावर आला आहे. या दोन जागांवर काँग्रसने दावा केला असताना शिवसेनेच्या ठाकरे गटाने या जागांवर उमेदवार जाहीर केला. त्यापार्श्वभूमीवर संजय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी “सांगली लोकसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे लोकसभा उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे स्वत: मिरज येथे दाखल झाले होते. त्यांनी मिरजमध्ये प्रचारसभा घेत चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली होती”, असे संजय राऊत म्हणाले.

“पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेची जागा नाही. कोल्हापूर ही आमची हक्काची जागा होती. साधारण 30 वर्ष आम्ही ती जागा लढवत होते. पण यंदा छत्रपती शाहू महाराजांचे नाव समोर आले आणि ते काँग्रेसच्या चिन्हावर लढणार हे समजल्यावर आम्ही त्यामध्ये कोणताही वादविवाद न करता कोल्हापूरची जागा आम्ही काँग्रेससाठी सोडली. कारण याबाबत महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्णय झाला होता”, असेही संजय राऊत म्हणाले.

“सध्या हातकणंगले मतदारसंघाबाबत राजू शेट्टी यांच्याशी शिवसेनेची चर्चा सुरू आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेकडे एखादी जागा असावी, त्यामुळे सर्वांनी मिळून त्या जागेवर विजय मिळवावा. त्यानुसार, आम्ही सांगलीत उमेदवारी जाहीर केली”, असेही संजय राऊत म्हणाले.

अमोल कीर्तिकरांच्या पाठिशी शिवसेना ठाम

“दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबाबत जे घडतंय तसंच, महाराष्ट्र आणि मुंबईत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेबाबत घडतं आहे. पण अमोल कीर्तिकर आणि आम्ही कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही. तुम्ही ईडी, सीबीआय किंवा आणखी काही लावा, भविष्यात तुमची ही सगळी हत्यारं बोथट ठरतील. केजरीवाल हे आजही तुरुंगातून काम करत असून त्यांची लोकप्रियता हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षाही जास्त झालेली आहे. अमोल कीर्तिकारांसाठी संपूर्ण शिवसेना पाठीशी उभी आहे. दहशतवादी आणि दबावाला झुकणारे आम्ही नाहीत. आम्ही लढणारे लोकं आहोत. आम्ही लढू आणू उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाची जागा अमोल कीर्तिकारांचे नाव कायम राहिल आणि ही जागा जिंकू”, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.


हेही वाचा – LOK SABHA 2024 : होऊ दे खर्च! निवडणूक आयोगाकडून प्रचारासाठी रेटकार्ड तयार

First Published on: March 27, 2024 1:33 PM
Exit mobile version