लोनाड येथील पुरातन शिवमंदिराची दुरवस्था; पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष

लोनाड येथील पुरातन शिवमंदिराची दुरवस्था; पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष

लोनाड मंदिराची दुरवस्था

महाशिवरात्री निमित्त सर्वत्र शिवमंदिरात भाविक भक्तिमय वातावरणात दर्शनासाठी जात असतात. महाराष्ट्र शासनाने क वर्ग तीर्थक्षेत्र म्हणून जाहीर केलेल्या भिवंडी तालुक्यातील लोनाड या गावातील ११ व्या शतकातील पुरातन रामेश्वर शिवमंदिराकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा प्रकार समोर आला. या मंदिराच्या नक्षीदार शिळा केव्हाही कोसळू शकत असल्याने येथील भक्तांना धोका निर्माण झाला. याबाबत येथील ग्रामस्थ आपल्या गावातील पुरातन ठेवा जपण्यासाठी चिंताक्रांत झाले आहेत.

भिवंडी तालुक्यातील लोनाड या आडवाटेच्या गावात ११ व्या शतकातील शिलाहार काळातील अपराक राजे यांचे पुत्र कशिदेव यांनी या मंदिराची स्थापना ११०६ मध्ये केल्याची नोंद आहे. या मंदिराला सुमारे ९१३ वर्ष झाले असून ठाणे जिल्ह्यातील सर्वात जुने शिवमंदिर म्हणून याचा उल्लेख आहे. या मंदिराची नोंद पुरातत्व विभाग कडे असल्याने या मंदिराची डागडुजी करण्याची जबाबदारी या विभागाकडे आहे. मागील कित्येक वर्ष सोयीस्करपणे या ठिकाणी दुर्लक्ष केले जात असल्याने कालपरत्वे या मंदिराच्या असंख्य शिळा कोसळल्या आहेत.

मंदिराचे कळस सुध्दा नामशेष झाले आहे. तर मंदिराच्या अन्य शिळा धोकादायक झाल्या असल्याने त्या केव्हाही कोसळून दुर्घटना होऊन भक्त किंवा स्थानिक नागरिक यांच्या जीवावर बेतू शकते. त्याच प्रमाणे बहुसंख्य तुटलेल्या शिळा मंदिरालगत ठेवण्यात आल्याने काही शिळा जमिनीत गाडल्या गेल्यात तर काहींवर चक्क शेणी थापल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. तर काही ग्रामस्थांनी या मंदिराच्या पुरातन शिळा आपल्या घराबाहेर ओसरीवर कपडे धुण्यासाठी लावल्या आहेत. यामुळे स्थानिक शिवभक्त आपल्या गावातील पुरातन मंदिर जोपासण्यासाठी पुरातत्व विभाग पूर्णतः दुर्लक्ष करित असल्याचा आरोप जितेंद्र गायकवाड यांनी केला आहे.

First Published on: March 4, 2019 8:55 PM
Exit mobile version