मुख्यमंत्र्याच्या अयोध्या दौऱ्याला साधू – संतांंचा विरोध

मुख्यमंत्र्याच्या अयोध्या दौऱ्याला साधू – संतांंचा विरोध

cm uddhav thackeray

राज्यात महाविकास आघाडी सरकारचे १०० दिवस पूर्ण होत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अयोध्या दौरा करणार आहेत. येत्या शनिवारी हा दौरा करणार असून या दौऱ्यात मुख्यमंत्र्यासह शिवसेनेचे अनेक नेते, आमदार, खासदार यांसह कार्यकर्तेही उपस्थित राहणार आहेत. मात्र या दौऱ्याला अयोध्येतील काही साधू-संतांनी विरोध केला आहे. यात प्रामुख्याने हनुमान गढीचे संत राजू दास यांचा समावेश आहे. त्यांनी आज एक ट्वीट करुन आपला विरोध दर्शवला. या ट्वीटमध्ये त्यांनी लिहीले की, “मुस्लीमांना पाच टक्के आरक्षण देणारी शिवसेना हिंदुत्वाच्या रस्त्यावरुन वेगळी झाली आहे, उद्धवला अयोध्येत येऊ देणार नाही.” मुख्यमंत्र्याचा एकेरी उल्लेख या ट्वीटमध्ये करण्यात आला आहे.

शिवसेनेची कोंडी?

मुख्यमंत्री ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर जात असून या दौऱ्यात शिवसेना शक्ती प्रदर्शन करणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान सेनेने राम मंदीराचा मुद्दा लावून धरत भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राम मंदीराचा प्रश्नही निकाली लागला आहे. मात्र निवडणुका झाल्यानंतर अयोध्येला जाण्याचे उद्धव ठाकरेंनी निवडणुकांपूर्वीच जाहीर केले होते, त्यानुासार हा पूर्वनियोजित दौरा असल्याचे सेनेकडून बोलले जात आहे. शिवसेना,राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि काॅंग्रेस यांच्या महाविकास आघाडीत हिंदुत्वामुळे शिवसेनेची कोंडी होत असून शिवसेनेला हिंदुत्वाची मवाळ भूमिका स्विकारावी लागल्याचे बोलले जाते.

अयोध्येत राजकारण नको

अयोध्येत या, दर्शन घ्या, आरती करा, पण अयोध्येत राजकारण करू नका… असं म्हणत अयोध्येतील काही संत-महंतांनी उद्धव ठाकरेंच्या यापूर्वीच्या दौऱ्यालाही विरोध केला होता, मात्र तेव्हा उद्धव ठाकरे तेव्हा मुख्यमंत्री नव्हते. यावेळी थेट मुख्यमंत्र्यांनाच विरोध झाल्याने या दौऱ्याची सगळीकडे चर्चा होत आहे.


हेही वाचा – नाणार प्रकल्पाचं समर्थन करणाऱ्या सेनेच्या जि. प. सदस्याची पक्षातून हकालपट्टी


 

First Published on: March 1, 2020 5:47 PM
Exit mobile version