राज्याच्या २२ मंत्र्यांची डॉ प्रदीप व्यास यांच्या बदलीसाठी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार, आरोग्यमंत्री टोपेही हतबल

राज्याच्या २२ मंत्र्यांची डॉ प्रदीप व्यास यांच्या बदलीसाठी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार, आरोग्यमंत्री टोपेही हतबल

कोरोना काळात अपुर्‍या सोयीसुविधा, रेमडेसिवीरचा तुटवडा, ऑक्सिजन नाही, बेड नाही, मृत कोरोना पेशंटच्या नातेवाईकांचा टाहो अशी परिस्थिती राज्यात सर्वत्र आहे. आमच्या सरकारने आरोग्य सचिव असलेल्या डॉ. प्रदीप व्यास यांना मेलेल्या माणसांची मोजदाद करण्याचे काम ठेवले आहे का? सदैव नकारात्मकता ठासून भरलेला हा अधिकारी महाराष्ट्राचे वाटोळे करणार, कोरोनाच्या महामारीतही केवळ कागदी घोडे नाचवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आकडेवारीमध्ये गुरफटून ठेवायचे असा एककलमी कार्यक्रम डॉ. व्यास यांचा आहे. आरोग्य सचिव यांच्या बदलीसाठी खात्याचे मंत्री राजेश टोपे यांनी शरद पवार यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेही तक्रार करून जर बदली केली जात नसेल तर आम्ही जनतेला तोंड कसे द्यायचे, असा सवाल महाविकास आघाडी सरकारमधील अनेक ज्येष्ठ मंत्र्यांनी ‘दै. आपलं महानगर’कडे केला. 22 मंत्र्यांनी तक्रार करूनही जर डॉ. व्यास यांची साडेचार वर्षांनंतरही बदली होत नसेल तर त्यांचा गॉडफादर कोण? अशी विचारणा आता सरकारमधील मंत्रीच करीत असल्याने कोरोना काळात महाराष्ट्राचा व्हिलन अशी डॉ. व्यास यांची प्रतिमा निर्माण झाली आहे.

प्रेझेंटेशन नको, ऑक्सिजन तुटवड्याचे काय करताय? ते सांगा…

‘राज्यात गेल्या वर्षभरात ऑक्सिजनचा एकही प्लान्ट नाही’, या मथळ्याखाली ‘दै. आपलं महानगर’ने 23 एप्रिलच्या अंकात बातमी प्रसिद्ध केल्यानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली. डॉ. प्रदीप व्यास यांच्या नकारात्मक वृत्तीची माहिती देण्यासाठी अनेकांनी फोन केले. त्यात महाविकास आघाडी सरकारमधील अनेक ज्येष्ठ मंत्री, इतर खात्याचे सचिव यांनी डॉ. व्यास यांचा नन्नाचा पाढा वाचला. याच आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली रेमडेसिवीरची उपलब्धता, ऑक्सिजनचा तुटवडा याबाबत प्री-कॅबिनेटची मीटिंग झाली. या बैठकीतही आरोग्यमंत्री राजेश टोपे, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्यासहीत मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य खात्याचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, मदत आणि पुनर्वसन खात्याचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांच्यासह अनेक सचिव व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते.
याच बैठकीत अनेक कॅबिनेट मंत्र्यांनी आरोग्य खात्याचे वाभाडे काढले. यावेळी डॉ. व्यास यांनी प्रेझेन्टेशन सादर केले. त्यावेळी अनेक मंत्र्यांनी प्रेझेन्टेशन आम्हाला दाखवू नका. आकड्यांचे कागदी घोडे नाचवू नका. ऑक्सिजनच्या तुटवड्याबाबत काय उपाययोजना करताय ते सांगा, रेमडेसिवीर इंजेक्शन कशी मिळणार ते सांगा, असा आक्रमक पवित्रा घेत डॉ. प्रदीप व्यास यांना धारेवर धरल्याची माहिती त्या बैठकीला उपस्थित असलेल्या एका वरिष्ठ सनदी अधिकार्‍याने ‘दै. आपलं महानगर’ला दिली. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही फिल्डवर जाताना काय अडचणी येतात. एकीकडे राज्याला मिळणार्‍या अपुर्‍या सोयीसुविधांबाबत केंद्र सरकारशी समन्वय करायचा आणि इकडे केवळ वेळखाऊ, नकारात्मक धोरण अवलंबले जात असेल तर पुढील काळ सर्वांसाठीच कठीण असल्याची खंत या बैठकीत व्यक्त केली.

नगरविकासमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनीही रेमडेसिवीर नाही, ऑक्सिजन नाही अशी भयानक परिस्थिती राज्यात असल्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लक्ष वेधले, असेही तो अधिकारी म्हणाला. या बैठकीनंतर अनेक कॅबिनेट मंत्र्यांनी आणि राज्यमंत्री असलेल्या अब्दुल सत्तार, विश्वजीत कदम, सतेज पाटील, आदिती तटकरे यांनीही डॉ. प्रदीप व्यास यांच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली. काँग्रेसच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने ‘दै. आपलं महानगर’शी बोलताना डॉ. व्यास हे दोन महिने आदर्श घोटाळा प्रकरणात तुरुंगात असल्याने त्यांचा मंत्र्यांंवर आणि राजकारण्यांवर राग आहे. व्यास हे अत्यंत प्रामाणिक अधिकारी असले तरी ते नकारात्मक असल्याने आरोग्य सोयीसुविधांबाबत अनेक गोष्टी प्रलंबित राहिल्याकडेही लक्ष वेधले.

नाचले फक्त कागदी घोडे 

शिवसेनेच्या एका मंत्र्याने जुलैनंतर परिस्थिती थोडीशी सुधारत असताना आरोग्य खात्याकडून ऑक्सिजन पुरवठा, रेमडेसिवीरच्या उपलब्धतेबाबत काहीच पुढाकार घेतला नाही. मध्यंतरीच्या काळात इंजेक्शनच्या निर्मितीसाठी लागणार्‍या कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने कंपन्यांनी वाढीव किमतीची मागणी केल्यावर सचिव केवळ नेगोशेबल करण्यातच व्यस्त राहिले आणि परिणामी वर्षभरानंतरही राज्याची ही अवस्था असल्याचे ते म्हणाले.

केवळ कागदी घोडे नाचवणे, नकारात्मक दृष्टीकोन बदलून सकारात्मकता दाखवल्यास अजूनही आपण अनेकांचे प्राण वाचवू शकतो. त्यामुळे डॉ. प्रदीप व्यास हे ठाकरे सरकारचे जावई आहेत का? त्यांची बदली का केली जात नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे व्यास यांना का पाठीशी घालत आहेत हा सवाल एका राज्यमंत्र्याने विचारला. यापूर्वी मुख्य सचिव अजोय मेहता यांनी मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती देत डॉ व्यास यांना कायम पाठिंबा दिला. जून ते डिसेंबरपर्यंत परिस्थिती ठीक असतानाही मुख्यमंत्र्यांचे सल्लागाार असलेल्या अजोय मेहता यांनी ऑक्सिजन तुटवडा, रेमडेसिवीरची उपलब्धतता करण्यासाठी काहीही प्रयत्न केले नाहीत याकडेही अनेक मंत्र्यांनी लक्ष वेधले. त्यामुळे व्यास यांच्याप्रमाणेच अजोय मेहताही तेवढेच जबाबदार आहेत.


 

First Published on: April 23, 2021 9:44 PM
Exit mobile version