जनतेच्या पैशावर चालणारे अधिवेशन पाण्यात; विरोधक बरसले

जनतेच्या पैशावर चालणारे अधिवेशन पाण्यात; विरोधक बरसले

विधानभवनात पाणी साचल्यानंतर आढावा घेताना विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे आणि अजित पवार

पावसाळी अधिवेशनाच्या आज तिसऱ्या दिवशी वीजपुरवठा बंद पडल्यामुळे दोन्ही सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करावे लागले. विधीमंडळाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा अशी घटना घडली असल्यामुळे विरोधकांनी आज सरकारचा खरपूस समाचार घेतला. “जनतेच्या पैशावर अधिवेशनाचा खर्च चालतो, सरकारच्या ढिसाळ नियोजनामुळे हा पैसा वाया घालवण्याचा अधिकार यांना कुणी दिला ? लोकशाहीचे धिंडवडे काढण्याचे काम राज्यसरकारने केले असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सरकारच्या अनागोंदी कारभारावर केला. विधीमंडळात पाणी कुणामुळे साचले? याला जबाबदार कोण आहे? गटारे का साफ केली नाही? पावसाळा सुरु होण्याच्याआधी महानगरपालिका, विधीमंडळाचे अधिकारी झोपा काढत होते का? असा संतप्त सवाल अजित पवारांनी उपस्थित करत सरकारला विधीमंडळाच्या बाहेर जेरीस आणले.

नागपूर येथे अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतलेला असताना याठिकाणी साध्या व्यवस्थाही सरकारला करता आलेल्या नाहीत हे सरकारचे अपयश आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल केला. तसेच सरकारने जलयुक्त शिवार ही योजना आणल्याचे माहीत होते, पण जलयुक्त विधानभवन आजच पाहिले, असे म्हणत ट्विटरवरल सरकारला कोपरखळी मारली आहे.

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे विधानभवन परिसराची पाणी करत असतानाचा एक फोटो जयंत पाटील यांनी ट्विट करत त्यावर ‘आपले ठेवायचे झाकून, दुसऱ्यांचे पाहायचे वाकून’, अशी मिश्लील टिप्पणी केली आहे.

 

सरकारची चालढकल पाणी साचण्याला कारणीभूत

ढिसाळ नियोजन, लहरी वृत्ती आणि गांभीर्याचा अभाव यामुळे नागपुर अधिवेशनात आज उद्भवलेल्या परिस्थितीमुळे अधिवेशन पाण्यात गेले असल्याची टीका करत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारच्या नियोजनशुन्य कारभारावर बोट ठेवले. दरम्यान नागपुरच्या रवी भवनातील २२ नंबरच्या कुटीरमध्ये राहणाऱ्या धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी पाणीच पाणी झाल्याने मुंडे यांच्यासह तेथील कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली आहे. आज कार्यालयात मुंडे यांनी चक्क मेणबत्त्या लावुन आपल्या कार्यालयाचे दैनंदिन कामकाज सुरूच ठेवले.

नागपूर येथे पावसाळी अधिवेशन होण्यासंदर्भात ज्यावेळी अहवाल मागवण्यात आला त्यावेळी तीन अधिकाऱ्यांची सचिवालय लेवलच्या अधिकाऱ्यांची समिती केली गेली होती. त्या तीन अधिकाऱ्यांच्या समितीने एक मोठा पाऊस आला तर कामकाज होवू शकणार नाही असा अहवाल सरकारला दिला होता परंतु तो अहवाल दाबून ठेवण्यात आला आणि अधिवेशन घेवून विनाकारण केलेला अट्टाहास समोर आला आहे असेही धनंजय मुंडे म्हणाले.

आज कामकाज का बंद झाले?

विधीमंडळाच्या परिसरामध्ये पाऊस पडला, त्या पाण्याचा ड्रेनेजच्या, गटाराच्या माध्यमातून निचरा व्हायला हवा होता. परंतु गटारे तुंबली असल्यामुळे विधानभवन परिसरामध्ये पाणी तुंबले आणि त्या पाण्यात वीजेचे सबस्टेशन गेल्याने सभागृहाची लाईट गेली आणि त्यामुळे आजचे कामकाज बंद करण्यात आले.

First Published on: July 6, 2018 1:47 PM
Exit mobile version