बहुमत सिद्ध करण्यासाठी शनिवारी विशेष अधिवेशन

बहुमत सिद्ध करण्यासाठी शनिवारी विशेष अधिवेशन

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नव्या शिंदे सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासाठी शनिवार, 2 व 3 जुलै 2022 रोजी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांचीही निवड होणार आहे.

राज्यात गेले 10 दिवस नाट्यमय घडामोडी घडत होत्या. शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला बरोबर घेत सत्ता स्थापन केल्याबद्दल शिवसेनेमधील एक गट नाराज होता. भाजपाशी पुन्हा युती करावी, अशी त्यांची मागणी होती. अखेर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सुमारे 50 आमदारांनी बंडखोरी करत पाठिंबा काढून घेतल्याने काल रात्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.

त्यानंतर आज एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला. यासंदर्भात घेतेलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांचे नाव जाहीर करून सर्वांनाच धक्का दिला. आपण सरकारमध्ये सहभागी होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडून आलेल्या सूचनेनुसार देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले.

राजभवनातील दरबार हॉलमध्ये झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर, भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आता राज्यपालांनी या नव्या सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे.

त्यानुसार महाराष्ट्र विधिमंडळाचे विशेष अधिवेशन 2 व 3 जुलै रोजी घेण्याचा निर्णय घेण्यात आला. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. तर, त्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बहुमत चाचणीला सामोरे जावे लागेल.

First Published on: June 30, 2022 9:53 PM
Exit mobile version