Maharashtra Bhushan accident : महाराष्ट्र भूषण सोहळा दुर्घटनेचा ठपका कुणावर? अहवालाचं काय झालं?

Maharashtra Bhushan accident : महाराष्ट्र भूषण सोहळा दुर्घटनेचा ठपका कुणावर? अहवालाचं काय झालं?

नवी मुंबई : राज्य सरकारचा यंदाचा महाराष्ट्र भूषण सोहळा अगदी दणक्यात झाला. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना २२ फेब्रुवारी रोजी राज्याच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवण्यात आले, मात्र गेल्या वर्षी महाराष्ट्र भूषण सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेच्या अहवालाचे काय झाले याचे उत्तर एका वर्षानंतरही मिळालेले नाही. गेल्या वर्षी १६ एप्रिल रोजी नवी मुंबईतील खारघरमधील विशाल सोहळ्यात ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्यावेळी उष्माघाताने १४ जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेमुळे महाराष्ट्र हादरून गेला होता. (Maharashtra Bhushan accident What happened to the report New Mumbai)

महाराष्ट्र भूषण २०२३ मधील दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने २० एप्रिल रोजी एक सदस्यीय समितीची स्थापन केली. महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर यांच्या समितीला अहवाल सादर करण्यासाठी एका महिन्याची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर चौकशीची दिशा ठरवणारे मार्गदर्शक तत्त्वे सरकारने ३ मे रोजी जाहीर केले. त्यानुसार ४ जून २०२३ रोजी नितीन करीर यांच्या समितीला अहवाल सादर करायचा होता. प्रत्यक्षात जूनच्या पहिल्या आठवड्यात समितीला पहिली एका महिन्याची मुदत मिळाली. त्यानंतरही अहवाल सादर करू न शकल्याने जुलैमध्ये दुसरी मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर समितीला अहवाल सादर करण्यासाठी तिसरी मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अहवाल सादर करणे गरजेचे होते.

ही समिती दुर्घटना कशी घडली याचा अहवाल देणार होती. त्यासाठी कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विविध स्थानिक यंत्रणांना आयोजकांनी विविध कामांची जबाबदारी सोपवली होती त्याचा आढावा घेणार होती. शिवाय भविष्यात अशा कार्यक्रमांच्या आयोजनात कोणती दक्षता घ्यावी याबाबत समिती शिफारसी करणार होती. आता महाराष्ट्र भूषण दुर्घटनेला एक वर्ष होत आले तरी समितीचा अहवाल जाहीर करण्यात आलेला नाही.

महाराष्ट्र भूषण हा राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. लाखोंच्या उपस्थितीतीत पुरस्कार सोहळा सुरू असताना उष्माघाताने १४ जणांचा मृत्यू होतो ही खूप गंभीर बाब आहे. या दुर्घटनेनंतर राज्यासह देशात खळबळ उडाली होती. आता या दुर्घटनेबाबतचा समितीचा अहवाल सरकारकडे सादर झाला का आणि सादर झाला असेल तर सरकार जाहीर का करीत नाही, असा महत्त्वाचा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. ही दुर्घटना कशामुळे घडली, याबाबत समितीने कुणावर ठपका ठेवला, नक्की कुणाची चूक झाली, या सर्व बाबी समोर येणे गरजेचे होते.

घटनाक्रम


हेही वाचा – Lok Sabha 2024 : शेतकरी कल्याणाचे दिवे 10 वर्षांत का लागले नाहीत? ठाकरे गटाचा भाजपाला सवाल

Edited By – Vaibhav Patil

First Published on: April 17, 2024 8:10 AM
Exit mobile version