घरदेश-विदेशLok Sabha 2024 : शेतकरी कल्याणाचे दिवे 10 वर्षांत का लागले नाहीत?...

Lok Sabha 2024 : शेतकरी कल्याणाचे दिवे 10 वर्षांत का लागले नाहीत? ठाकरे गटाचा भाजपाला सवाल

Subscribe

मागील आठवड्यात महाराष्ट्रात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने थैमान घातले, बळीराजाला संकटात ढकलले, पण उठता-बसता शेतकऱ्यांचे नाव घेणारे राज्यातील सत्ताधारी कुठे गायब आहेत? असा प्रश्न ठाकरे गटाने विचारला आहे.

मुंबई : राज्यातील गरीब शेतकऱ्यांचे नशीब निसर्ग आणि राज्यकर्ते यांच्या ‘लहरी’वर हेलकावे खात आहे. शेतमालाला आधारभूत किंमत देण्याचे आश्वासन विसरून गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचार सभांमधून पुन्हा शेतकऱ्याच्या कल्याणाची ‘गॅरंटी’ देत मतांचा जोगवा मागत आहेत, परंतु मागील दहा वर्षांत शेतकरी कल्याणाचे दिवे ते का लावू शकले नाहीत? शेतकरी हिताचे त्यांचे शाब्दिक बुडबुडे हवेतच का विरून गेले? लहरी निसर्ग आणि लहरी राजा या कोंडीतून शेतकऱ्याची सुटका का होऊ शकलेली नाही? आधी या प्रश्नांची उत्तरे द्या आणि मग ‘मोदी गॅरंटी’च्या भूलथापा मारा, असे ठाकरे गटाने सुनावले आहे. (Lok Sabha Election 2024: Thackeray group attacks Modi government on farmers’ issues)

गेल्या आठवड्यात महाराष्ट्राला अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झोडपून काढले. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील फळबागा जमीनदोस्त झाल्या. शेतातील उभे पीक आडवे झाले. राज्यातील शेतकऱ्याने मदतीसाठी टाहो फोडला आहे, परंतु ना राज्यकर्त्यांच्या कानांचे पडदे त्यामुळे थरथरले आहेत ना स्थानिक प्रशासनाचे. राज्यकर्ते लोकसभा निवडणूक आणि परस्पर शह-काटशहामध्ये मग्न आहेत, तर सरकारी यंत्रणा निवडणूक ‘कर्तव्या’त गुंतलेली आहे. अवकाळीच्या तडाख्याने पुन्हा उद्ध्वस्त झालेल्या बळीराजाकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे वेळ कुठे आहे? असे तिखट सवाल ठाकरे गटाने केला आहे.

- Advertisement -

अवकाळीग्रस्त शेतकरी सरकारकडे मदतीसाठी आक्रोश करीत आहे, पण सरकार कुठे आहे? ते लोकसभा निवडणुकीच्या मस्तीत मश्गूल आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्याला अवकाळीच्या संकटावर उतारा हवा आहे आणि राज्यकर्ते ‘मोदी गॅरंटी’ची ‘भूल’ देऊन बळीराजाची क्रूर चेष्टा करीत आहेत, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सामना दैनिकातील अग्रलेखातून केली आहे.

कर्जबाजारी होत शेतकरी कष्टाने पीक काढतो. मात्र ते कधी अवकाळी-गारपीट हिरावून नेते, तर कधी सरकारी धोरणांमुळे कवडीमोल भावाने विकावे लागते. कधी निर्यात बंदीचा तर कधी निर्यात शुल्कवाढीचा नांगर कांदा पिकावरून फिरतो. केंद्र सरकारपेक्षा जास्त नुकसानभरपाईच्या मिंधे सरकारच्या घोषणा पंचनाम्यांच्या अफरातफरीत विरून जातात, अशी टीकाही ठाकरे गटाने केली आहे.

- Advertisement -

मागील आठवड्यात महाराष्ट्रात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने थैमान घातले, बळीराजाला संकटात ढकलले, पण उठता-बसता शेतकऱ्यांचे नाव घेणारे राज्यातील सत्ताधारी कुठे गायब आहेत? राज्यकर्ते प्रचारात, प्रशासन निवडणूक कामात आणि अवकाळीग्रस्त शेतकरी वाऱ्यावर अशी सध्या महाराष्ट्राची दारुण अवस्था आहे, असे या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.


Edited by – Manoj S. Joshi

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -