12th Board Exam : बारावीच्या परीक्षा वेळापत्रकात बदल, ५ आणि ७ मार्चचे पेपर पुढे ढकलले

संग्रहित छायाचित्र

बारावीच्या परीक्षा काही दिवसांवर आल्या आहेत. यापूर्वीच आता बारावीच्या परीक्षेत बदल करण्यात आला आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांचे ५ मार्च आणि ७ मार्च रोजी होणारे पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत. पेपर पुढे ढकलण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे. २३ फेब्रुवारीला पुणे-नाशिक महामार्गावर प्रश्न पत्रिका नेणाऱ्या टेम्पोला अचानक आग लागली होती. यामध्ये टेम्पो पूर्ण जळून खाक झाला होता. बारावीच्या हिंदी आणि मराठीच्या प्रश्नपत्रिका होत्या त्या जळून खाक झाल्या आहेत. यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र बोर्डाकडून पेपर पुढे ढकलण्यात आली असल्याची महिती दिली आहे.

बारावीच्या वेळापत्रकात अंशतः बदल करण्यात आला आहे. बारावीचे पेपर पुढे ढकलण्यात आले असून ते आता एप्रिलमध्ये घेण्यात येणार आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांचे हिंदी आणि मराठी या विषयाचे पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत. ५ आणि ७ मार्चला होणारे पेपर आता ५ एप्रिल आणि ७ एप्रिल या तारखेला होणार आहेत. याबाबतची नोंद घ्यावी असे परिपत्रक महाराष्ट्र बोर्डाकडून काढण्यात आले आहे.

पुणे-नाशिक महामार्गावरुन अहमदनगरच्या दिशेने बारावी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका घेऊन एक आयशर टेम्पो निघाला होता. परंतु महामार्गावर या टेम्पोला अचानक आग लागली आणि संपूर्ण टेम्पो जळून खाक झाला. या आगीमध्ये सगळ्या प्रश्न पत्रिका जळाल्या आहेत. यामुळे परीक्षांवर याचा परिणाम झाला असल्याचे दिसत आहे. तात्काळ प्रश्न पत्रिका उपलब्ध करता येणार नाही यामुळे बोर्डाने पेपर पुढे ढकलण्यात आले असल्याचे जाहीर केले आहे.

प्रात्यक्षिक परीक्षा कधी होणार

वेळापत्रकानुसार इयत्ता बारावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी व तोंडी, अंतर्गत गुणांच्या परीक्षा १४ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२२ दरम्यान तर लेखी परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल २०२२ दरम्यान होणार आहेत. माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान ऑनलाईन परीक्षांचा कालावधी ३१ मार्च ते ९ एप्रिल २०२२ असा असेल. त्याचप्रमाणे इयत्ता दहावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी व तोंडी, अंतर्गत गुणांच्या परीक्षा २५ फेब्रुवारी ते १४ मार्च २०२२ दरम्यान तर लेखी परीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल २०२२ दरम्यान होणार आहेत.

यापूर्वीच्या वेळापत्रकानुसार शनिवार दिनांक 05 मार्च 2022 रोजी प्रथम सत्रात होणारी हिंदी विषयाची तसेच द्वितीय सत्रात होणारी जर्मन, जपानी, चिनी, पर्शियन विषयांची परीक्षा आता मंगळवार दिनांक 05 एप्रिल 2022 रोजी नियोजित वेळेत होईल. तर, सोमवार दिनांक 07 मार्च 2022 रोजी प्रथम सत्रात होणारी मराठी, गुजराती, कन्नड, सिंधी, (अरेबिक/देवनागरी) मल्याळम, तमिळ, तेलुगु, पंजाबी, बंगाली विषयांची तसेच द्वितीय सत्रात होणारी उर्दू, फ्रेंच, स्पॅनिश आणि पाली विषयांची परीक्षा आता 07 एप्रिल 2022 रोजी नियोजित वेळेत होईल.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) च्या लेखी परीक्षा व अन्य परीक्षेच्या उर्वरित वेळापत्रकात इतर कोणताही बदल नाही. त्याचप्रमाणे माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेच्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तरी वेळापत्रकातील उपरोक्त अंशत: बदलाची सर्व उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक/ प्राचार्य, विद्यार्थी, पालक व अन्य संबंधित घटकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी कळविले आहे.


हेही वाचा : 12th Question Paper Burned : बारावीच्या प्रश्नपत्रिका घेऊन जाणारा टेम्पो आगीत खाक, अचानक घेतला पेट

First Published on: February 24, 2022 5:19 PM
Exit mobile version