आदित्य ठाकरेंचा कोकण दौरा; नितेश राणेंच्या मतदारसंघात करणार एन्ट्री

आदित्य ठाकरेंचा कोकण दौरा; नितेश राणेंच्या मतदारसंघात करणार एन्ट्री

शिवसेना नेते व राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्या ठाकरे आजपासून ३ दिवस कोकण दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यात सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिह्यात शिवसेनेचे मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. सिंधुरत्न समृद्ध योजनेचे लोकार्पण, गणपतीपुळे नळपाणी योजनेचे भूमिपूजन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान कोकण म्हणजे राणेंचा बालेकिल्ला. आता या बालेकिल्ल्यात शिवसेना नेते आदित्य ठाकरे एन्ट्री करणार आहेत. त्यामुळं या दौऱ्यात आदित्य ठाकरे नेमकं काय बोलणार हे याची सर्वांनाच उस्तुकता लागली आहे.

२८ ते ३० मार्चपासून कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात आदित्य ठाकरे सकाळी चिपी विमानतळावर दाखल होणार असून, त्यानंतर मालवण जेट्टीवर पाहणी करणार आहेत. त्यानंतर कुणकेश्वर मंदिरात दर्शन घेऊन नितेश राणेंच्या देवगड मतदारसंघात सभा घेणार आहेत. देवगड नगरपंचायतीत शिवसेनेच्या विजयी नगरसेवकांच्या सत्काराचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.

मालवण इथं बंदर जेटीची पाहणी करून झाल्यानंतर फिश ऍक्वेरियमसंदर्भात चर्चा करणार आहेत. दुपारी १२ वाजता देवगड नगर परिषदअंतर्गत रस्त्याचं भूमिपूजन होणार आहे. त्यानंतर ३:३० वाजता वायंगणी येथील कासवजत्रा कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. ४ वाजून १५ मिनिटांनी आरवली येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ संलग्न पोमेंतो ग्रूपच्या पंचतारांकित हॉटेलची पाहणी ते करणार आहेत.

संध्याकाळी ५ वाजता वेंगुर्ला शासकीय विश्रामगृहाच्या नूतनीकरणाच्या कामाचं भूमिपूजन, पाणबुडी प्रकल्प व जलपर्यटन विकसित करण्यासाठी प्रस्तावित वेंगुर्ला जेटीची पाहणी, ऑब्झर्वेशन डेकचे उद्घाटन, फिशिंग व्हिलेज महोत्सवाचे उद्घाटन, फळ संशोधन केंद्र अंतर्गत कृषी पर्यटन प्रशिक्षण केंद्राची पाहणी ते करणार आहेत. संध्याकाळी ६ वाजता मधुसूदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृह वेंगुर्ला येथे सिंधुरत्न समृद्ध योजनेचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे.

दरम्यान, मागील अधिवेशनावेळी भाजपा नेते नितेश राणे यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर उभे राहून आदित्य ठाकरे यांना ‘म्यॅाव म्यॅाव’ म्हणत डिवचलं होतं. तसंच, दिशा सालियन प्रकरणयांसह विविध प्रकरणात राणे कुटुंबियांनी आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले होते. त्यामुळं आता आदित्य ठाकरे यावर प्रत्युत्तर देणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा – मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला शिवसैनिकांनी भरचौकात दिला चोप

First Published on: March 28, 2022 9:12 AM
Exit mobile version