‘वर्षा’ बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी; लवकरच राहण्यास जाण्याची शक्यता

‘वर्षा’ बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी; लवकरच राहण्यास जाण्याची शक्यता

दक्षिण मुंबईतील ‘वर्षा’ बंगला हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे सरकारी निवास स्थान म्हणून ओळखले जाते. काही दिवसांपूर्वी हाच वर्षा बंगला सोडून राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाची पाटी या बंगल्याच्या बाहेर लावण्यात आली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हे वर्षा बंगल्यावर राहायला जाणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मुख्यमंत्र्यांचे वास्तव्य हे वर्षा बंगल्यावर

शिवसेनेचे बंडखोर आमदार एखनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तसेच, भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे नियमाप्रमाणे मुख्यमंत्र्यांचे वास्तव्य हे वर्षा बंगल्यावर असते. मात्र, अद्याप मुख्यमंत्री होऊन महिना उलटला तरी, एकनाथ शिंदे ‘नंदनवन’ बंगल्यावर राहत आहेत.

शिंदेंचा मुक्काम ‘नंदनवन’वर कायम

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा सत्तेत आल्यापासून एकनाथ शिंदे हे मलबार इथल्या ‘नंदनवन’ सरकारी निवासस्थानी राहत आहेत. तेव्हापासून आज मुख्यमंत्री झाले तरी शिंदेंचा मुक्काम ‘नंदनवन’वर कायम आहे. मात्र, वर्षा बंगल्याबाहेर पाटी लागल्याने एकनाथ शिंदे त्या बंगल्यावर निवासासाठी जाणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर महाराष्ट्रात सत्तासंघर्ष सुरु झाला. त्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २२ जून रोजी ‘वर्षा’ निवासस्थान सोडले होते. तेव्हापासून हा बंगला रिकामाच होता. अखेर एक महिन्यानंतर वर्षा निवासस्थानाला एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी लावली गेली आहे. तसेच ‘वर्षा’ बंगल्याची रंगरंगोटी देखील पूर्ण झाली आहे.


हेही वाचा – गणेशोत्सवासाठी ‘दिव्या’हून कोकणात विशेष गाड्या सोडा; मनसेचे रेल्वेला पत्र

First Published on: August 4, 2022 8:23 PM
Exit mobile version