Maharashtra lockdown 2021 : कडक अंमलबजावणी झालीच पाहिजे, मुख्यमंत्र्यांचे यंत्रणेला आदेश

Maharashtra lockdown 2021 : कडक अंमलबजावणी झालीच पाहिजे, मुख्यमंत्र्यांचे यंत्रणेला आदेश

Maharashtra lockdown 2021 : कडक अंमलबजावणी झालीच पाहिजे, मुख्यमंत्र्यांचे यंत्रणेला आदेश

राज्यात गेल्या वेळेस आपण कोरोनाचा संसर्ग रोखून दाखविला होता, मात्र आताची परीक्षा अधिक कठीण व आव्हानात्मक आहे त्यामुळे ब्रेक दि चेन मधील निर्बंधांची (Maharashtra curfew) अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी होईल याकडे सर्व जिल्हाधिकारी तसेच पोलीस यंत्रणेने लक्ष द्यावे. कोणत्याही परिस्थितीत आपल्याला गाफील राहून चालणार नाही आणि संसर्ग आणखी फैलावलेला परवडणार नाही असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जिल्हा प्रशासनाला अधिक दक्ष राहण्यास सांगितले.आज ते सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी , पालिका आयुक्त तसेच पोलीस अधिकाऱ्यांसमवेत आयोजित बैठकीत बोलत होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

अंमलबजावणी करतांना मनात गोंधळ ठेवू नका, स्पष्टता ठेवा असेही मुख्यमंत्री म्हणाले. या बैठकीस महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास, मदत व पुनर्वसन प्रधान सचिव असीम गुप्ता, पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, तसेच राज्याच्या व जिल्ह्यांच्या टास्क फोर्सचे डॉक्टर्स आदींची उपस्थिती होती.

यावेळी राज्य शासनाने दुर्बल घटकातील व गरीब लोकांसाठी जाहीर केलेले आर्थिक सहाय्य व्यवस्थित त्यांच्यापर्यंत पोहोचावे तसेच कोणत्याही तक्रारी येणार नाही यादृष्टीने चांगले नियोजन करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. पावसाळ्यापूर्वी जम्बो सुविधा तपासा, फायर ऑडीट करून घ्या

मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोना विषाणूचे म्युटेशन झालेले आपल्याकडील नमुन्यांमध्ये आढळले आहे. गेल्या वर्षीपेक्षा संसर्गाचा वेग खूप जास्त आहे, तरुण पिढी जास्त संसर्गित झाली आहे. ऑक्सिजन उपलब्ध करून घेण्यासाठी आपण युद्ध पातळीवर प्रयत्न करीत आहोत. जिल्ह्यांच्या डॉक्टर्सनी बदललेल्या उपचार पद्धतींबाबत नेमकेपणाने काय करायचे ते राज्याच्या तज्ञ टास्क फोर्सकडून समजून घ्यावे. ऑक्सिजनचा उचित व योग्य वापर तसेच रेमडीसीव्हीरसंदर्भात काळजीपूर्वक पाऊले उचलावी लागतील. तसेच आपण उभारलेल्या जम्बो सुविधा या येणारा पावसाळा , वादळे लक्षात घेऊन सुरक्षित आहेत किंवा नाही ते तपासून घ्यावे . सर्व रुग्णालयांचे अग्नि सुरक्षा ऑडीट त्वरेने पूर्ण करून घ्यावे, यात कोणताही निष्काळजीपणा ठेवू नये. सूक्ष्म आणि लहान कंटेनमेंट क्षेत्रांकडे विशेष लक्ष द्यावे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

जीवनावश्यक आणि आवश्यक सेवा सुविधा बंद केलेल्या नाहीत मात्र याचा अर्थ तिथे नियम मोडले जात आहेत, किंवा गर्दी होत आहे असे दृश्य दिसता कामा नये. अन्यथा त्या सुविधा स्थानिक प्रशासनाने बंद कराव्यात अशा स्पष्ट सुचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. विवाह समारंभ हे कोरोना संसर्गास मोठ्या प्रमाणावर जबाबदार असल्याचे लक्षत आले आहे, त्यादृष्टीने यावेळेस सर्व नियम व्यवस्थित पाळले जात आहेत किंवा नाहीत हे जिल्हा व पोलीस प्रशासनाने पाहावे असेही ते म्हणाले.

याप्रसंगी मंत्री बाळासाहेब थोरात, अमित देशमुख, राजेश टोपे यांनी देखील आपल्या सुचना मांडल्या. यावेळी जिल्ह्याजिल्ह्यातील टास्क फोर्सच्या डॉक्टर्सनी उपचार पद्धतीबाबतच्या आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. राज्याच्या टास्क फोर्सचे डॉक्टर संजय ओक, शशांक जोशी, तात्याराव लहाने यांनी देखील रेमडीसीव्हीरचा अनावश्यक वापर टाळावा हे सांगतांना ऑक्सिजन सांभाळून व गरजेप्रमाणेच वापरावा हे सांगितले. एचआरसीटी तपासण्या तसेच प्लाझ्मा वापर याबाबतीतही त्यांनी मार्गदर्शन केले.

प्रारंभी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, आपण कडक निर्बंध लावले आहेत त्याची चांगली अंमलबजावणी होईल हे पाहताना आपला मुख्य उद्देश हा कोविड्ची संसर्ग साखळी तोडणे हा आहे हे लक्षात ठेवावे आणि कुठलाही अतिरेक किंवा विसंगत कृती करू नये, कोणतीही शंका असल्यास मंत्रालयाला तातडीने मार्गदर्शन मागावे.

First Published on: April 14, 2021 8:32 PM
Exit mobile version