राज्यातील पहिली ते बारावीचे वर्ग १ डिसेंबरपासून सुरू

राज्यातील पहिली ते बारावीचे वर्ग १ डिसेंबरपासून सुरू

कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे २० महिन्यांपासून बंद असलेले प्राथमिक शाळेचे दरवाजे येत्या १ डिसेंबरपासून उघडणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारच्या बैठकीत शहरी भागात पहिली ते सातवी तर ग्रामीण भागात पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास मान्यता दिली. त्यामुळे 1 डिसेंबरपासून राज्यातील पहिली ते बारावीचे सर्व वर्ग सुरू होणार असल्याने मार्च २०२० नंतर प्रथमच राज्यातील शाळा सरसकट भरणार आहेत.

कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य विचारात घेऊन ऑनलाईन शिक्षणाला प्राधान्य देण्यात आले होते. कोविड-19 चा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी ग्रामीण भागात पाचवीपासून तर शहरी भागात आठवीपासून शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. आता मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळासोबत तसेच पीडियाट्रिक टास्क फोर्ससोबत चर्चा केल्यानंतर येत्या 1 डिसेंबरपासून पहिलीपासूनच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिली ते चौथी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याबाबत अनेक मतमतांतरे होती. या प्रस्तावाबाबत आम्ही आरोग्य विभागाचा अभिप्राय घेतला होता. मुख्य सचिवांचाही अभिप्राय घेतला होता. तसेच कृती दलाच्या तज्ज्ञांशी चर्चा केली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही हा प्रस्ताव पाठविण्यात आला होता.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांचे आरोग्य विचारात घेऊन सुरक्षितपणे शाळा सुरू करण्यास आम्ही वचनबद्ध असल्याचे शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी सांगितले. टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्यातील हा तिसरा टप्पा आहे. या कालावधीत सुरक्षित वातावरणात शिक्षण सुरू राहण्यासाठी परिश्रम घेतलेल्या शाळा आणि शिक्षकांचे शिक्षण मंत्र्यांनी कौतुक केले आहे. त्याचबरोबर यापुढेही कोविड-19 संदर्भातील दक्षता घेण्याची सूचना त्यांनी केली आहे. काही विद्यार्थी पहिल्यांदाच प्रत्यक्ष शाळेत येतील, त्यांचे आणि इतर विद्यार्थ्यांचे आरोग्य जपणे ही आपली प्राथमिकता असेल, असे त्या म्हणाल्या. शाळा सुरू करण्याचा निर्णय झाल्याने शाळांवर आता अधिकची जबाबदारी असणार आहे. कोरोनाविषयक सर्व नियमावलींचे पालन शाळांना करावे लागणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मार्गदर्शक सूचना आज दुपारी होणार जाहीर
1 डिसेंबरपासून राज्यातील प्राथमिक शाळा सुरू होणार आहेत. या विद्यार्थ्यांचे लसीकरण झाले नसून हे विद्यार्थी लहान असल्याने त्यांच्या आरोग्याची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे यासंदर्भात विशेष मार्गदर्शक सूचनांची आवश्यकता आहे. त्यामुळे पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी शुक्रवारी दुपारपर्यंत मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात येणार आहे. लहान मुलांसाठी जर अधिकची खबरदारी घेण्याची आवश्यकता असेल तर त्याबाबतही तज्ज्ञांशी चर्चा करण्यात येईल, असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

ऑनलाईन-ऑफलाईन शिक्षणाबाबत संभ्रम
ग्रामीण भागात पाचवी ते बारावी तर शहरी भागात आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाले. यावेळी शाळांकडून ऑनलाईन व ऑफलाईन असे दोन्ही पद्धतीने वर्ग घेण्यात येत आहेत. मात्र, आता पूर्ण क्षमतेने आणि सर्व वर्ग सुरू होणार आहेत. त्यामुळे ऑनलाईन व ऑफलाईन असे दोन्ही प्रकारे वर्ग घेणे शक्य नसल्याचे शिक्षकांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे ऑनलाईन की ऑफलाईन याबाबत संभ्रम कायम ठेवण्यात आला आहे.

First Published on: November 26, 2021 5:04 AM
Exit mobile version