मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रात मोठे यश  मिळेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास

मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रात मोठे यश  मिळेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास

मुंबई :  आगामी लोकसभा निवडणुकीत आधीच्या निवडणुकीतील सर्व विक्रम मोडीत निघतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आम्हाला देशात आणि महाराष्ट्रातही मोठे यश मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केला. विरोधकांनी लोकसभेच्या ४ ते ६ जागा राखल्या तरी खूप मोठी बाब होईल, असा टोलाही त्यांनी महाविकास आघाडीला लगावला.

‘इंडिया टुडे’ने ‘सी-वोटर’बरोबर ‘मूड ऑफ द नेशन’ सर्वेक्षण केले असून आजच्या घडीला  लोकसभेची निवडणूक झाली तर भाजपच्या जागा कमी होतील , असा अंदाज वर्तवला आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या जागा वाढण्याची शक्यता सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आली आहे. यावर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली.

गेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये जे यश भाजप आणि आम्हाला मिळाले, त्याची आकडेवारी डोळ्यासमोर ठेवली असती तर अंदाजाला खरा आधार मिळाला असता. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका होतील, या निवडणुकीचा निकालाचा सर्व्हे हा सर्वांत मोठा असेल. जे आकडे समोर आले आहेत, ते आता निवडणुका झाल्या तर या गृहितकावर आधारित आहेत. मात्र दीड वर्षांनी निवडणुका होणार आहेत. आघाडी होणार आहे असे गृहित धरून निकालाचे अंदाज बांधणे म्हणजे दिशाभूल आहे. राजकारणात दोन अधिक दोन चार कधीच होत नाही, असे सांगत एकनाथ शिंदे यांनी आघाडीच्या ऐक्याबाबत शंका उपस्थित केली.

महाविकास आघाडीने मागील लोकसभेच्या निवडणुकीत जेवढ्या जागा जिंकलेल्या आहेत, तेवढ्या जागा देखील आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीला राखता येणार नाहीत. या राज्यामध्ये जे काम आम्ही करतोय, ते पाहून लोक खूश आहेत. लोक सुज्ञ आहेत. मागील अडीच वर्षात कामच झाले नाही. काम न करणाऱ्यांना लोक पसंती देतील की काम करणाऱ्या लोकांना लोक निवडतील हे सर्वांनाच ठाऊक आहे, असेही शिंदे म्हणाले.

विरोधकांच्या छातीत धडकी बसली आहे. आपल्या पक्षातील कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात जाऊ नयेत म्हणूनच हा खटाटोप काही पक्ष करत आहेत. देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल लोकांमध्ये आदर आहे. ते लोकप्रिय आहेत. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आधीच्या निवडणुकीतील सर्व विक्रम मोडीत निघतील. राजकारणात आकडेवारीला खूप महत्त्व असते. सध्याच्या सर्वेक्षणामुळे  कोणाला हर्षवायू झालेला असेल तर त्यांनी तो आनंद जरूर घ्यावा. त्यांचा आनंद मला हिरावून घ्यायचा नाही. आम्ही दीड वर्षे काम करत राहू. तुम्ही दीड वर्षे  सर्वेक्षण अंदाजाचा  आनंद घ्या, असा टोलाही शिंदे यांनी आघाडीला  लगावला.


बरं झालं गद्दार गेले, त्यांच्यामुळे हिरे सापडले; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाला टोला

First Published on: January 27, 2023 10:00 PM
Exit mobile version