Maharashtra HSC Result 2021: बारावी निकालासाठी मूल्यमापन पद्धत जाहीर, पाहा फॉर्म्युला

Maharashtra HSC Result 2021: बारावी निकालासाठी मूल्यमापन पद्धत जाहीर, पाहा फॉर्म्युला

महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी च्या परीक्षा रद्द केल्यानंतर सर्व घटकाशी चर्चा करून विद्यार्थ्यांची मूल्यमापन व गुणदान कार्यपद्धती सुनिश्चित केली आहे. यंदा १२वी परीक्षेस प्रविष्ठ सर्व विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारावर उत्तीर्ण करण्यासाठी राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. राज्य सरकारने धोरण तयार करताना सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांचा विचार केला आहे. तसेच इ.१२ वी मध्ये असणारे सर्व प्रकारच्या विषयांचा विचार करण्यात आला आहे. यामध्ये बारावीच्या निकालासाठी दहावीचे ३० टक्के, अकरावीचे ३० टक्के आणि बारावी वर्षातील ४० टक्के असे मुल्यमापन करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

निकालाच्या मूल्यमापनाचे धोरण तयार करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या मार्गदर्शन तसेच विभागातील तज्ञ, मुख्याध्यापक, शिक्षक, लोकप्रतिनिधी, पालक संघटना, तंत्रज्ञान कंपन्या यांनी दिलेल्या मौल्यवान सुचना दिल्या आहेत. सध्याच्या असामान्य परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या योग्य मूल्यमापनासाठी इ. १२ वीच्या वर्षातील अंतर्गत मूल्यमापन, इ. ११ वीचे वार्षिक मूल्यमापन तसेच इ. १० वीमधील मंडळाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळालेल्या ३ विषयांचे सरासरी गुण ग्राह्य धरले जातील.

ही तात्पुरती व्यवस्था असली तरी विद्यार्थ्यांची कोविड-१९ पूर्व काळातील (सामान्य परिस्थितीमधील) शैक्षणिक पातळीही विचारात घेण्यात आली आहे. सध्या बारावीत असलेल्या विद्यार्थ्यांच्या मागील दोन वर्षांचा (इ.१० वी व इ.११ वी) निकाल कोविडपूर्व वस्तुनिष्ठ मूल्यमापनावर आधारित आहे. विद्यार्थ्यांचे एकूण मूल्यांकन लेखी आणि अंतिम तोंडी / प्रात्यक्षिक परीक्षा / अंतर्गत मूल्यमापना आधारे ठरवले जाईल. अंतिम तोंडी / प्रात्यक्षिक परीक्षा / अंतर्गत मूल्यमापनाच्या र्यपद्धती नुसार केलं जाईल. यात प्रत्यक्ष प्राप्त गुण अंतिम निकालात समाविष्ट केले जातील.

लेखी परीक्षेसाठी निर्धारित एकूण गुणांपैकी ३०% गुण इ. १० वी परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त ३ विषयांची सरासरी, इ.११ वी च्या वार्षिक मूल्यमापनातील विषय निहाय ३० % गुण, इ.१२ वी वर्षातील अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्रपरीक्षा, सराव परीक्षा-चाचण्या, तत्सम मूल्यमापनातील विषय निहाय ४० % गुण अवलंबून असतील. लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेसाठी इयत्ता निहाय संपादणुकीकरिता विषय वर्गवारीनुसार गुण विभागणी केली आहे.

असमाधानी विद्यार्थ्यांना परीक्षेची संधी

जे विद्यार्थी निकालाने असमाधानी असतील त्यांना कोविड १९ ची परिस्थिती सामान्य झाल्यानंतर मंडळाच्या प्रचलित पद्धतीनुसार श्रेणीसुधार योजनेअंतर्गत यापुढील लगतच्या दोन परीक्षांमध्ये प्रविष्ट होण्याची संधी उपलब्ध असेल. बारावीनंतर उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देशपातळीवर मूल्यमापनाचे एकसमान सूत्र निश्चित करावे, यासाठी महाराष्ट्र आग्रही होता. त्यानुसार मुलांच्या मूल्यमापनात सुसुत्रूता/एकवाक्यता रहावी म्हणून केंद्रीय मंडळांनी जाहीर केलेल्या धोरणाशी सुसंगत असा धोरण राज्य सरकारने तयार केल असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.

विद्यार्थ्यांचे निकाल अंतिम करण्यासाठी उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर मुख्याध्यापकांच्या / प्राचार्यांच्या अध्यक्षतेखाली ७ सदस्यांची निकाल समिती असेल. निकालपत्रांच्या अभिलेखांची पडताळणी विभागीय स्तरावर शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून करण्यात येईल. कोरोनाकाळ शिक्षणक्षेत्रासाठी अतिशय अवघड व आव्हानात्मक ठरला. २०२०-२१ शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांना बरीच तडजोड करावी लागली.विद्यार्थ्यांनी मोठ्या जिद्द-चिकाटीने पालक,गुणवंत शिक्षकांच्या सहकार्याने आपली वाटचाल पुढे सुरूच ठेवली असल्याचे वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.

First Published on: July 2, 2021 7:18 PM
Exit mobile version