कर्नाटकची मुजोरी, महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावात नो एन्ट्री

कर्नाटकची मुजोरी, महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावात नो एन्ट्री

बसवराज बोम्मई

महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पेटत असताना आता या दोन्ही राज्यांत हिवाळी अधिवेशन सुरु आहे. कर्नाटक विधानसभेचे हिवाळी बेळगावात सुरु होत आहे. या अधिवेशनापूर्वी आज महाराष्ट्र एकीकरण समितीने मराठी बांधवांच्या न्याय हक्कांबाबत आवाज उठवण्यासाठी व्हॅक्सीन मैदानावर जाहीर मेळाव्याचं आयोजन केले होते. मात्र कर्नाटक पोलिसांनी अचानक मेळाव्यास परवागनी नाकारली आहे. कर्नाटकात कलम 144 लागू करण्यात आले असून जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. यात कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील नेत्यांनाही कर्नाटकात येण्यास बंदी घातली आहे. असे असतानाही महाराष्ट्रातील नेते बेळगावाच्या दिशेने रवाना झाले आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अनेक कार्यकर्त्यांना आता पोलिसांनी ताब्य़ात घेतले आहे.

महाराष्ट्र एकीकरण समितीमार्फत दरवर्षी बेळगावात जाहीर मेळावा होतो. यंदाही ह हा मेळावा आज होणार होता. ज्यासाठी पूर्ण तयारी झाली होती. या मेळाव्याला प्रशासनाने परवानगी दिल्याचेही एकीकरण समितीने सांगितले होते. मात्र आता अचानक मेळाव्यास दिलेली परवानही नाकारण्यात आली आहे.

कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद थांबवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह दिल्लीत एक महत्वाची बैठक पार पडली. मात्र बैठकीतील निर्णयास कुठेतरी कर्नाटक सरकारने हरताळ फासली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीमार्फत आयोजित मेळाव्यासाठी उभारण्यात येणाऱ्या स्टेजचे काम थांबवण्यात आले. बेळगावचे पोलीस आयुक्त रविंद्र गाडादी यांनी काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत.

यावर रविंद्र गाडादी म्हणाले की, मेळाव्यास कोणताही परवानगी देण्यात आलेली नाही. यासंदर्भात एकीकरण समितीला पत्र पाठवले होते. मेळाव्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून परवानगी नाकारण्यात आली आहे. या प्रकरणावरून पुन्हा एकदा कर्नाटकची मुजोरी समोर आली आहे. आज अचानक पोलिसांनी स्टेजचे काम थांबवले असून ही आमची गळचेपी असल्याची टीका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांनी केली आहे.

बेळगावमध्ये कलम 144 लागू करण्यात आलं आहे. यामुळे पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही. दरम्यान, महाविकास आघाडीचे नेते आज कर्नाटकात जाणार आहेत, त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून जाणाऱ्या वाहनांची जागोजागी तपासणी केली जात आहे. मात्र कर्नाटक सरकारने मेळाव्यास परवागनी नाकारल्याने महाराष्ट्रातील नेत्यांनाही कर्नाटकात येण्यास बंदी घातली आहे.


हिवाळी अधिवेशनात ठाकरे गट आक्रमक; ‘या’ मुद्द्यांवरून सरकारला घेरणार

First Published on: December 19, 2022 10:21 AM
Exit mobile version