पुण्यात इमारतीचा स्लॅब कोसळून 5 मजुरांचा मृत्यू, 3 जखमी; याप्रकरणी तिघांना अटक

पुण्यात इमारतीचा स्लॅब कोसळून 5 मजुरांचा मृत्यू, 3 जखमी; याप्रकरणी तिघांना अटक

महाराष्ट्रातील पुण्यात गुरुवारी रात्री उशिरा इमारतीचा स्लॅब कोसळून 5 मजुरांचा मृत्यू झाला आहे, तर 3 मजूर गंभीर जखमी झाले आहेत. पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्याच्या शास्त्रीनगर परिसरातील गल्ली क्रमांक आठमध्ये ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत बचाव मोहीम राबवून दहा मजूरांना सुरक्षितरित्या बाहेर काढले आहे. दरम्यान या घटनेत जखमी झालेल्या मजुरांवर आता उपचार सुरु आहेत. दरम्यान या घटनेत मोठ्याप्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे.

या घटनेत झालेल्या 5 मजुरांच्या मृत्यूप्रकरणी आता पुणे पोलिसांनी एका कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल करत तीन जणांना ताब्यात घेतले आहे. अशी माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.

 


वाहतूक पोलिस आयुक्त राहुल श्रीरामे यांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवड्यातील शास्त्रीनगर वाडिया बंगला गेट नंबर आठ येथील एका इमारतीच्या स्लॅब भरण्याचे काम सुरु होते त्यामुळे हा अपघात झाला.  बांधकाम सुरू असलेल्या या इमारतीच्या तळघरात रात्री उशिरा काम सुरू होते. यावेळी अचानक पार्किंगमध्ये मोठा लोखंडी स्लॅब पडला. स्लॅब टाकण्यासाठी 16 मिमी जड लोखंडी सळ्यांपासून जाळी तयार करण्यात आली होती. यावेळी अचानक ती लोखंडी जाळी काम करणाऱ्या 10 मजुरांवर पडली.

त्या जाड लोखंडी जाळीच्या सळ्या मजुरांच्या शरीरात घुसल्या. रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास या घटनेची माहिती मिळाली. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तात्काळ मदत कार्य सुरु केले. तसेच घटनेत गंभीर जखमी झालेल्या 3 मजुरांवर तात्काळ उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. हे मजूर कोठून आले आणि कधीपासून येथे काम करत होते, याचाही शोध पोलीस घेत आहेत.

पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक

पुण्यातील घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांप्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. सोबतच जे जखमी झालेले आहे त्याची प्रकृती लवकर सुधारावी असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.


 

First Published on: February 4, 2022 11:32 AM
Exit mobile version