Lok Sabha 2024 : मोदींच्या राज्यात महिलांची मंगळसूत्रे गहाण पडली; संजय राऊत यांची टीका

Lok Sabha 2024 : मोदींच्या राज्यात महिलांची मंगळसूत्रे गहाण पडली; संजय राऊत यांची टीका

मुंबई : काँग्रेसच्या राज्यात नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच राज्यात महिलांची मंगळसूत्रे गहाण पडली आणि लुटली गेली. मोदींनी आणलेल्या नोटाबंदीमुळे आणि टाळेबंदीमुळे हजारो, लाखोंचा रोजगार गेला. त्या काळात महिलांना मंगळसुत्रे विकून घरे चालवावी लागली. त्यामुळे जो माणूस स्वतःच्या घरातल्या मंगळसूत्राला प्रतिष्ठा देऊ शकला नाही त्याने दुसऱ्यांच्या मंगळसूत्रांची उठाठेव करू नये, अशी जोरदार टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी आज केली. (Lok Sabha Election 2024 Mangalsutras of women were mortgaged in Modi’s state Sanjay Raut)

राजस्थानमधील सभेमध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आई-बहिणींचे मंगळसूत्रही शिल्लक ठेवणार नाही, अशी टीका केली होती. संजय राऊत यांनी आज प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधीशी बोलताना मोदी यांच्या विधानाचा समाचार घेतला. जम्मू काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांच्या पत्नींची मंगळसूत्रे देखील मोदींमुळेच गेली. मोदी पुरस्कृत, भाजपा पुरस्कृत दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडितांचे जीव घेतले. त्यामुळे त्या महिलांची मंगळसूत्रे गेली. मणिपूरमधील कित्येक महिलांनी आपली मंगळसूत्रे गमावली. या सगळ्याला जबाबदार कोणी असेल तर ते नरेंद्र मोदी आहेत. आतापर्यंत किती मंगळसूत्रांची प्रतिष्ठा मोदींनी ठेवली आहे? असा सवाल करत या देशात मंगळसूत्रांवर गंडांतर आले असेल तर ते केवळ मोदींमुळे आले आहे, असा आरोप राऊत यांनी केला.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : कपटी लोकांसाठी मनसे पुढे येत असेल तर…; विनायक राऊत यांनी सुनावले

काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांनी ‘वारसा करा’ संदर्भात केलेल्या वक्तव्याबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, पित्रोदा यांनी जे वक्तव्य केले आहे त्याबाबत काँग्रेसने भूमिका स्पष्ट केली असून ते त्यांचे व्यक्तिगत मत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसे असेल तर मोदी आपल्या देशातील बायकांच्या मंगळसूत्रांना हात घालू लागले आहेत, पाकीटमारी करू लागले आहेत. ती भाजपची भूमिका आहे का?, असा सवाल त्यांनी केला.

सांगलीतून काँग्रेस बंडखोर विशाल पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतलेली नाही, याकडे राऊत यांचे लक्ष वेधले असता, आमच्या पहेलवानाशी लढत द्यायला एक उमेदवार कमी पडतोय म्हणून भाजपाने तिथे दोन उमेदवार उभे केले आहेत. यामागे कोणाची प्रेरणा, ताकद आहे हे योग्य वेळी बोलूच. हे भाजपाचे कारस्थान असून त्यांच्यासाठी सांगलीची निवडणूक सोपी नाही. महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना लोकांचा पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे घराघरात भरलेले लिफाफे वाटण्यासाठी भाजपाने अप्रत्यक्षपणे दुसरा उमेदवार मैदानात आणल्याची शंका लोकांच्या मनात आहे. दरम्यान, शिंदे आणि अजित पवार गटाचाही एकही खासदार निवडून येणार नाही. येत्या 4 जूननंतर शिंदे गट आणि अजित पवार गट राज्याच्या राजकारणातून पूर्णपणे नामशेष झालेले असतील, असा दावाही संजय राऊत यांनी केला.

हेही वाचा – Lok Sabha 2024: जाहीरनामा समजावून सांगतो, वेळ द्या; खर्गेंचं मोदींना पत्र

Edited By – Rohit Patil

First Published on: April 25, 2024 7:21 PM
Exit mobile version