शरद पवारांच्या सल्ल्याशिवाय राज्य इंचभरही पुढे जाणार नाही – संजय राऊत

शरद पवारांच्या सल्ल्याशिवाय राज्य इंचभरही पुढे जाणार नाही – संजय राऊत

शरद पवारांशिवाय मोदींना पर्याय आणि विरोधकांची एकजूट शक्य नाही, संजय राऊतांचे वक्तव्य

“कालपर्यंत मी शरद पवारांबाबत बोलत होतो. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही त्यांचे भरभरून कौतुक केले. हे पाहून बरे वाटलं. आजवर ज्या भूमिका पवारांबात मी मांडत आलो, त्याचे हे यश आहे.”, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. नाशिक येथे माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांचे भरभरुन कौतुक केले आहे. तसेच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार ३० डिसेंबर रोजीच होणार असून खातेवाटपाबाबत कोणताही गोंधळ नाही. महाविकास आघाडीचे सरकार हे शरद पवारांच्या सल्ल्याशिवाय एक इंचही पुढे जाणार नाही, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

 

“स्व. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्यातच महाराष्ट्र घडविण्याची क्षमता होती. बाळासाहेबानंतर शरद पवार यांनी सर्वांना एकत्र घेऊन राज्यात बदल घडवून दाखवला. शरद पवारांचा संसदिय लोकशाहीवर गाढा विश्वास आहे. त्यामुळे ते प्रत्येक काम लोकशाहीच्या मार्गानेच करतात, असा माझा अनुभव आहे.”, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.

गृहखात्याबाबत कोणताही गोंधळ नाही – संजय राऊत

मंत्रिमंडळ विस्तारानंतर गृहखाते कुणाला मिळणार? याबाबत सध्या अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. हाच प्रश्न संजय राऊत यांना विचारला असता ते म्हणाले की, गृहखात्याबाबत कोणतेही घोडे अडलेले नाही. गृहखात्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच निर्णय घेतील. तसेच मुख्यमंत्री हे सर्व खात्यांचे प्रमुख असतात. गृहखाते कुणाकडेही गेले तरी काही फरक पडणार नाही, असे राऊत यांनी सांगितले.

First Published on: December 26, 2019 4:27 PM
Exit mobile version