हप्तेबाजीत महाराष्ट्राच्या झोकांड्या जात आहेत, ड्रग्जप्रकरणावरून ठाकरे गटाचा निशाणा

हप्तेबाजीत महाराष्ट्राच्या झोकांड्या जात आहेत, ड्रग्जप्रकरणावरून ठाकरे गटाचा निशाणा

मुंबई : सोलापुरातून 20 कोटींचे ड्रग्ज चार दिवसांपूर्वी पकडले. नाशिक, पुण्यात असे ड्रग्ज सापडत आहेत. मुंबई-ठाण्यातील उच्चभ्रू वस्त्या आणि हॉटेलांतून ड्रग्जचे सेवन वाढले आहे तसेच ते सहज उपलब्ध होत आहे हे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अपयश आहे. स्थानिक पोलिसांच्या संगनमताशिवाय नशेचा व्यापार चालू शकत नाही. पोलीस ‘वर’ हप्ते देऊन त्यांच्या सध्याच्या पदांवर आले आहेत. त्यामुळे त्यांना त्यांची वसुली करावी लागत आहे, पण या हप्तेबाजीत महाराष्ट्राच्या झोकांड्या जात आहेत, असा निशाणा ठाकरे गटाने सरकारवर साधला आहे.

हेही वाचा – “ते भांग पित नसतील, पण…”, ड्रग्ज रॅकेटवरून संजय राऊतांची गृहमंत्री फडणवीसांवर सडकून टीका

महाराष्ट्रात सरकार आहे की नाही, याबाबत लोकांच्या मनात संभ्रम आहे. सरकारचे अस्तित्वच दिसत नसल्यामुळे महाराष्ट्र अमली पदार्थ विक्रीचा व सेवनाचा मोठा बाजार झाला आहे. नाशिक येथील अमली पदार्थाच्या ‘मॅन्ड्रेक्स’ गोळ्या बनविण्याचा कारखाना राजकीय आश्रयाखालीच सुरू होता व त्या कारखान्याचा म्होरक्या ललित पाटील हा ससून इस्पितळातून पळाला, पण आता मुंबई पोलिसांनी त्याला म्हणे चेन्नासेंद्रम येथून अटक केली, असे ठाकरे गटाने सामना दैनिकातील अग्रलेखात म्हटले आहे.

‘‘मी पळालो नाही, तर मला पळविण्यात आले. योग्य वेळी मी या सगळ्याचा भंडाफोड करीन,’’ असे या ललित पाटीलने अटकेनंतर सांगितले. ललित पाटीलचे ससूनमधून पलायन व आता त्याची अटक हे एक फिक्सिंग असून यामागे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील शिंदे गटाचे दोन मंत्री असल्याचा आरोप काँग्रेसचे नाना पटोले, रवींद्र धंगेकर यांनी केला असल्याचे या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा – निवडणुकीपूर्वी ‘302’च्या अनेक गुन्हेगारांना मुक्त करून…, ठाकरे गटाचा सरकारवर गंभीर आरोप

अमली पदार्थांच्या व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘एनसीबी’ नावाची केंद्रीय यंत्रणा आहे. त्या यंत्रणेचे आर्यन खान प्रकरणातील प्रताप उघड झाल्यावर तेथील भ्रष्ट, बनावट कारभाराचे वाभाडेच निघाले. दोन-पाच ग्रॅम नशेची धरपकड करणाऱ्या अशा यंत्रणेच्या नजरेत नाशिकचा नशेचा कारखाना व शेकडो कोटींची ‘मॅन्ड्रेक्स’ खेप आली नाही, याकडे ठाकरे गटाने लक्ष वेधले आहे.

महाराष्ट्राचा ‘पंजाब’ व्हावा, शिकागो-बँकॉक व्हावे, नायजेरियाप्रमाणे नशेबाज म्हणून हे राज्य बदनाम व्हावे असे कोणी कारस्थान रचले आहे काय? महाराष्ट्राच्या संपूर्ण सरकारवर सत्तेच्या नशेचा अंमल ‘कुत्ता गोली’प्रमाणे चढला आहे. मिळेल त्या मार्गाने पैसा ओढायचा. मग तो नशेच्या व्यापाराचा का असेना! इथपर्यंत सरकारच्या नीतिमत्तेची घसरण झाली आहे, अशी जोरदार टीका ठाकरे गटाने केली आहे.

First Published on: October 20, 2023 1:15 PM
Exit mobile version