पोलिसांच्या अटीशर्तींसह छत्रपती संभाजीनगरमध्ये मविआची आज जाहीरसभा

पोलिसांच्या अटीशर्तींसह छत्रपती संभाजीनगरमध्ये मविआची आज जाहीरसभा

रामनवमीच्या आदल्या दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या तणावपूर्ण परिस्थिती नंतर आता याच शहरात महाविकास आघाडीची पहिली सभा घेण्यात येणार आहे. आज सायंकाळी सहा वाजता सांस्कृतिक मंडळ मैदानावर ही जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी महाविकास आघाडीचे सर्वच प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. तसेच या सभेला मोठी गर्दी देखील जमण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. त्यामुळे पोलिसांनी सुद्धा अनेक अटी आणि शर्थींसह या सभेला परवानगी दिलेली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या महाविकास आघाडीच्या या सभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेले आहे.

पोलीस प्रशासनाने देखील अनेक अटी घालून सभेला परवानगी दिल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली आहे. या सभेच्या वेळेत आणि सभेच्या ठिकाणांमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात येऊ नये. तसेच कार्यक्रमाच्या वेळी शहरातील कोणताही रहदारीचा रस्ता बंद करण्यात येऊ नये. वाहतुकीला अडथळा होणार नाही याची काळजी आयोजकांकडून घेण्यात यावी. या सभेसाठी येणाऱ्या नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी. सभेला येताना आणि सभेतून परत जाताना कोणतेही आक्षेपार्ह अशी घोषणाबाजी करण्यात येऊ नये किंवा सभेमध्ये हुल्लडबाजी असभ्यवर्तन होणार नाही याची आयोजकांकडून दक्षता घेण्यात यावी, यांसह अन्य काही अटी घालून पोलीस प्रशासनाकडून या सभेला परवानगी देण्यात आलेली आहे.

गेल्या चार दिवसांपासून महाविकास आघाडीच्या जाहीर सभेची जोरदार तयारी करण्यात येत होती. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे स्वतः या सभेसाठीच्या व्यासपीठापासून ते येणाऱ्या लोकांना बसण्याची व्यवस्था करेपर्यंत लक्ष घालताना दिसून आले.
मिळालेल्या माहितीनुसार, या सभेसाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकीय वातावारणासह जातीय वातावरण देखील तापलेले आहे. त्यामुळे या सभेच्यावेळी कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या हिंसाचारानंतर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधण्यात येत आहे. तर राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असल्याने राजकीय वातावरण आणखी चिघळत आहे. दरम्यान, आज होणाऱ्या मविआच्या जाहीर सभेमध्ये मविआच्या नेत्यांकडून नेमके काय बोलण्यात येते, हे देखील पाहणे तितकेच महत्वाचे ठरणार आहे.


हेही वाचा – छत्रपती संभाजीनगरमध्ये आज राजकीय रणसंग्राम

First Published on: April 2, 2023 8:32 AM
Exit mobile version