मुंबईच्या माणदेशी महोत्सवात घ्या साताऱ्याचा खर्डा, झणझणीत चटणीचा आस्वाद

मुंबईच्या माणदेशी महोत्सवात घ्या साताऱ्याचा खर्डा, झणझणीत चटणीचा आस्वाद

मुंबई – दोन वर्षांच्या कालावधीनंतर बहुप्रतिक्षित पाचवा माणदेशी महोत्सव यंदा ५ ते ८ जानेवारी २०२३ दरम्यान प्रभादेवी येथील रविंद्र नाट्यमंदिराच्या प्रांगणात भरणार आहे. साताऱ्यातील दुष्काळग्रस्त माण तालुक्यातील उत्पादनाला बाजारपेठ मिळावी याकरता माणदेशी महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. साताऱ्याचा खर्डा, लोणची, चटणी, सोलापूरची जेन घोंगडी येथे विकत घेता येणार आहे.

साताऱ्यातील माण तालुक्यात दुष्काळामुळे शेती होत नाही, त्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र चेतना सिन्हा यांनी माणदेशी फाऊंडेशनच्या रुपाने माणदेशी भगिनींच्या आयुष्याला कलाटणी दिली आहे. त्यांनी हाती घेतलेल्या प्रकल्पातून महिलांना स्वयंरोजगार गवसला. माणदेशी भगिनी उद्योग-व्यवसाय करू लागल्या. पण तयार केलेल्या उत्पादनाची बाजारपेठ शहरात कशी मिळवावी? त्यातूनच ‘माणदेशी महोत्सव’ जन्माला आला.

हेही वाचा राज्यात पारा घसरला; हुडहुडी वाढली

माणदेशातील महिलांना त्यांच्या औद्योगिक कौशल्याशी निगडीत यंत्रमागावर काम करण्यास शिकवण्यात आले. जेणेकरून मोठ्या प्रमाणावर उत्पादननिर्मिती कशी करावी याचे प्रशिक्षण देण्यात आले, ज्यामुळे तब्बल ७ हजार महिलांनी माणदेशी फाऊंडेशनने उपलब्ध करून दिलेली स्वयंरोजगारासाठीची यंत्रे विकत घेतली. यापैकी कित्येक महिलांना १०-२० हजार रुपयांची छोटी कर्जे माणदेशी महिला सहकारी बॅंकेने उपलब्ध करून दिली. शेतकऱ्यांचा शेतमाल ग्राहकांकडे पोहोचेपर्यंत अनेक माध्यमामधून जातो. त्यामुळे ग्राहकांना अतिरिक्त पैसे मोजावे लागतात तर शेतकऱ्याला कवडीमोलाचा भाव मिळतो. हे लक्षात घेऊन शेतकऱ्यांचा शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी माणदेशी फाऊंडेशनने शेतकऱ्यांना मदत केली. त्याचसोबत दोन प्रकारचे गूळ पावडर आणि डाळी यांचे ब्रॅण्ड्स तयार केले. या सगळ्या महिला व शेतकरी अद्ययावत प्रशिक्षण घेऊन माणदेशी महोत्सवाला मुंबईकरांच्या भेटीला येत आहेत.

यंदाच्या महोत्सवात प्रसिद्ध भारुडकार चंदाताई तिवाडी आपली कला सादर करणार आहेत. माणदेशी चॅम्पीयन महिला कुस्ती त्याचबरोबर माणदेशी लोकनृत्याचा प्रकार असलेले ‘गझी नृत्य’ पाहण्यास देखील मिळणार आहे. त्याचप्रमाणे १० लाख महिलांचा परिवार असलेल्या माणदेशातील काही शेतकरी, उद्योजिका आणि ऍथलिट्स भगिनी आपल्या संघर्षगाथा माणदेशीच्या व्यासपीठावरुन उलगडणार आहेत.

यासोबत या महोत्सवात आपण स्वतः कुभांरकाम करण्याचा आनंद घेऊ शकता, स्वत: उभं राहून लाटणं तयार करून घ्या, लाखेच्या बांगड्या बनवून घ्या, टोपली किंवा झाडू वळवून घ्या, ही सारी गावातली संस्कृती येथे अनुभवता येणार आहे. जर तुम्ही खवय्ये असाल तर साताऱ्याचा खर्डा, शेंगदाण्याच्या चटणीसह वेगवेगळ्या चटण्या, लोणची, ज्वारीची भाकरी, कुरड्या, मासवड्या, साताऱ्याचे जगप्रसिद्ध कंदी पेढे तुमच्या प्रतिक्षेत आहेत त्याच बरोबर साताऱ्याची प्रसिद्ध जेन घोंगडीही तुम्ही येथे खरेदी करू शकता.

First Published on: December 27, 2022 4:27 PM
Exit mobile version