मराठा आरक्षणाचे सेनानी शांताराम कुंजीर यांचे निधन; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

मराठा आरक्षणाचे सेनानी शांताराम कुंजीर यांचे निधन; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक शांताराम कुंजीर यांचे निधन

मराठा समाजाचे सेनानी, लढवय्ये नेते आणि मराठा आरक्षणाच्या आंदोलनात कायम अग्रेसर असणारे शांताराम कुंजीर यांचे सोमवारी रात्री हृदयविकाराने पुणे येथे निधन झाले. ते ५६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल मराठा समाजातील सर्व स्तरामधून दु:ख व्यक्त करण्यात येत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा समाजाचे नेते श्रीमंत कोकाटे यांनीही दु:ख व्यक्त केले आहे.

समाजाच्या प्रश्नांसाठी संघर्षशील पण सनदशीर मार्गाने प्रयत्न करता येतात. त्यासाठी संघर्षाला अभ्यासाची जोड द्यावी अशी जाणीव निर्माण करणारा लढवय्या आणि संवेदनशील कार्यकर्ता शांताराम बापू कुंजीर यांच्या निधनामुळे हरपल्याची शोक भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

शोक संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, मराठा समाजाच्या संघर्षशील चळवळीला अभ्यासाची जोड देण्यासाठी शांताराम कुंजीर यांनी प्रयत्न केले. त्यामुळेच मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक म्हणून त्यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सनदशीर आणि शांततापूर्ण चळवळ उभी केली. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी त्यांनी अभ्यासपूर्ण अशी मांडणी केली. पण त्यासाठी संघर्षाची तयारी ठेवली. सामाजिक लढा देताना समाजातील अन्य घटकांप्रतीही संवेदनशीलता बाळगण्याची काळजी घेतली. त्यामुळेच त्यांच्या आंदोलनाला सर्वसमावेशक आणि व्यापक असा पाठिंबा मिळाला. त्यांच्या निधनामुळे सामाजिक चळवळतील अभ्यासू, लढवय्या कार्यकर्ता हरपला आहे.

सामाजिक भान असलेला नेता हरपला – उपमुख्यमंत्री

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि मराठा समाजासह शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नांसाठी लढणारे शांताराम कुंजीर यांच्या निधनाने सामाजिक चळवळीतील झुंजार कार्यकर्ता हरपला असल्याची शोकभावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शांताराम कुंजीर यांनी मराठा समाजाच्या दु:ख, वेदना आणि प्रश्नांसाठी कायमच संघर्षाची भूमीका घेतली. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक म्हणून त्यांनी मोठी जबाबदारी पार पाडली.
मराठा समाजाच्या विविध प्रश्नांसाठी संघर्ष करताना तरुणांनी वाचन करुन आपले ज्ञान वाढविले पाहिजे असा त्यांचा नेहमी आग्रह असे. परस्पर विरोधी विचारांच्या लोकांशी समन्वय आणि संवाद ठेवून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम तडीस नेले.गेल्या २६ वर्षांपासून विविध आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी आपले सामाजिक लढ्याचे काम केले. त्यांच्या निधनाने सामाजिक भान असलेला कार्यकर्ता हरपला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

पुरोगामी विचारधारेशी तडजोड न करणारा नेता – श्रीमंत कोकाटे

शांताराम कुंजीर आणि प्रवीण गायकवाड म्हणजे महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील धनाजी-संताजीची जोडी! मराठा महासंघाचे आण्णासाहेब पाटील, शशिकांत पवार, बामसेफचे वामन मेश्राम, मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांच्यासोबत कुंजीर साहेबांनी कार्य केले. सुरुवातीच्या काळात ते शिवसेनेत सक्रिय होते. शांताराम कुंजीर हे वैचारिकदृष्ट्या खूप प्रगल्भ होते. त्यांचे अफाट वाचन होते. ते प्रवाहपतीत नव्हते, त्यामुळेच ते परिवर्तनाच्या लढ्यात उतरले. एका बाजुला सामाजिक लढा तर दुसऱ्या बाजूला जगण्याचा संघर्ष सुरू होता.एका हॉटेलमध्ये मॅनेजर, नंतर तुळशीबागेत दुकान, नंतर हॉटेल सुरू केले. अनेक छोटे मोठे व्यवसाय त्यांनी केले. अपयशाने ते खचून गेले नाहीत. हसत मुखाने संकटाला सामोरे गेले. पण कधी रडगाणे केले नाही. पुरोगामी विचारधारेशी त्यांनी कधी तडजोड केली नाही. ते जितके नम्र होते तितकेच ते बाणेदार होते. अशा कर्तृत्ववान कुंजीर साहेबांचा अकाली मृत्यू धक्कादायक आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना खूप दुःख होत असल्याची प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते, इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी व्यक्त केली आहे.

 

First Published on: May 5, 2020 9:58 PM
Exit mobile version