मराठा आरक्षणासाठी घटनादुरुस्ती करा; आमचा पाठिंबा – शरद पवार

मराठा आरक्षणासाठी घटनादुरुस्ती करा; आमचा पाठिंबा – शरद पवार

शरद पवार यांची कोल्हापूर येथे जाहीर सभा

मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी आम्ही देशातील अभ्यासू वकिलांसोबत चर्चा केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, घटनेच्या काही कलमामध्ये बदल केल्यास मराठा आरक्षण मिळण्यासंबंधी मार्ग निघू शकतो. पण घटनेत बदल करण्यासाठी लोकसभा आणि राज्यसभेत बहुमत असावे लागते. आज ज्यांची महाराष्ट्रात सत्ता त्यांचे लोकसभेत बहुमत आहे. मात्र राज्यसभेत बहुमत नाही. पण मी राज्यसभेत आहे, त्यामुळे त्यांनी लोकसभेत घटनादुरुस्तीला मान्यता दिल्यास राज्यसभेतील विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळवून देण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करेल, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापूर येथे व्यक्त केली आहे.

कोल्हापूर येथे पक्षाच्या कार्यक्रमानिमित्त शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की, ५० टक्क्यांच्या वर आरक्षण देणारा देशातला पहिले राजे छत्रपती शाहू महाराज याच कोल्हापूर जिल्ह्यातले होते. शाहू महाराजांच्या न्यायिक भूमिकेपासून प्रेरणा घेत राज्यकर्त्यांनी निर्णय घ्यावा, अशी सूचना पवार यांनी केली.

 

सत्ताधारी नेत्यांमुळे आंदोलन भडकले

मराठा समाजाने ५८ मुक मोर्चे काढले होते. त्यात पेड लोक असल्याची टीका कोल्हापूरच्या नेत्यांनी केली आहे. म्हणजे मोर्चे शांततेत काढले गेले ते काय पगारी नोकर होते का? अशी टीका पवार यांनी महसूल मंत्री चंद्रकातदादा पाटील यांचे नाव न घेता केली. मंत्र्यांच्या अनाठायी वक्तव्यामुळे मराठा समाजाचा संताप अनावर झाला आणि त्याचा परिणाम गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत असल्याचे पवार म्हणाले.

पवार पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोकसभेत महाराष्ट्रातले पाच खासदार आहेत. त्यापैकी सुप्रिया सुळे आणि धनंजय महाडीक यांनी मराठा आरक्षणाची मागणी सभागृहात मांडलेली आहे. उद्या घटनादुरुस्तीचा प्रस्ताव आणला तर त्याला सुद्धा आम्ही लोकसभेत पाठिंबा देऊ. ही घटनादुरुस्ती झाली तर हरयाणा आणि गुजरात राज्यातीलही आरक्षणाच्या मागणीचा प्रश्न सुटू शकतो, असे वक्तव्य पवार यांनी केले आहे.

साहेब आमचा सयंम तुटत चाललाय…

पवार भाषण करत असताना काही तरूणांनी “साहेब आमचा सयंम तुटत चाललाय…” अशी खंत बोलून दाखवली. यावर पवार यांनी तरुणांची समजूत घातली. ते म्हणाले की, मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहोत. पण तरुणांनी सयंम सोडून चुकीचे काही करु नये. आक्रमक आंदोलनामुळे तुमची न्यायाची चळवळ बदनाम करु नका. लहान मुले, महिला यांना आंदोलनाचा त्रास होणार नाही याची काळजी घ्या, असे आवाहन पवार यांनी केले.

First Published on: July 28, 2018 12:36 PM
Exit mobile version