मराठा आरक्षण : ८ डिसेंबरला विधान भवनावर लाँग मार्च!

मराठा आरक्षण : ८ डिसेंबरला विधान भवनावर लाँग मार्च!

मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाकडून मुंबईत अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे ८ डिसेंबरला विधान भवनावर धडक लाँग मार्च काढण्यात येणार आहे. या आंदोलनामध्ये मराठा समाज वाहनांमधून सहभागी होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. ओबीसी नेत्यांनी मन मोठे केल्यास आरक्षणाचा प्रश्न न्यायालयाबाहेरच मार्गी लागेल, अशी भूमिकाही यावेळी मांडण्यात आली.

मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय बैठक रविवारी पुण्यात झाली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राजेंद्र कोंढरे यांनी ही माहिती दिली. यावेळी विनोद साबळे, तुषार काकडे, विरेंद्र पवार आदी उपस्थित होते. कोंढरे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीनंतर मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर विपरीत परिणाम झाला आहे. अकरावी प्रवेशामध्ये अनेक विद्यार्थ्यांना सवलतीचा लाभ मिळणार नाही.

वैद्यकीय प्रवेशाबाबत मंत्र्यांनी दिलेला शब्द पाळलेला नाही. एमएसईबी व इतर नोकरभरतीबाबत दिलेला शब्द फिरविला आहे. प्रत्येकवेळी सर्वोच्च न्यायालयाकडे बोट दाखवून मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. याविरोधात अधिवेशनादरम्यान ८ तारखेला राज्यभरातून मुंबईतील विधान भवनावर लाँग मार्च काढण्यात येणार आहे. अधिवेधन पुढे ढकलल्यास पायी लाँग मार्च काढण्याचा निर्धार करण्यात आला आहे. तत्पूर्वी, दि. १ व २ डिसेंबर रोजी राज्यभरातील महावितरणच्या अधिक्षक अभियंता कार्यालयासमोर निदर्शने केली जाणार आहेत. त्याचप्रमाणे राज्यभरातून आरक्षणासंदर्भात निवेदने घेऊन सर्वोच्च न्यायालयाला पाठविली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

छत्रपतींच्या राजकीय भूमिकांना पाठिंबा नाही

खासदार छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती उदयनराजे यांच्या राजकीय भूमिकांना मराठा क्रांती मोर्चाचा पाठिंबा नसल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. मोर्चा हा बिगर राजकीय असून दोन्ही छत्रपतींचा सामाजिक दृष्टीने पाठिंबा आहे. पण त्यांच्या राजकीय भूमिकेवर मोर्चा काही भाष्य करणार नाही, असे नमूद करण्यात आले.

वर्षा गायकवाड यांच्या राजीनाम्याची मागणी

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रत मिळण्याआधीच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी अकरावीची प्रवेश प्रक्रिया थांबविली. त्यामुळे दुसर्‍या प्रवेश यादीत प्रवेश मिळू शकणार्‍या मराठा समाजातील हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. त्या मराठाद्वेषी असल्यानेच ही कार्यवाही केली. त्यामुळे गायकवाड यांचा राजीनामा घेऊन हकालपट्टी करण्याची मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली.

ओबीसी नेत्यांनी मन मोठे करावे

मराठा समाजाची भावना आहे की, शरद पवार, उध्दव ठाकरे, राज ठाकरे यांच्यासह विविध नेते आणि विशेषत: ओबीसी नेत्यांनी मन मोठे केले. आरक्षणाचा प्रश्न न्यायालयाबाहेरच मार्गी लागेल. संपूर्ण महाराष्ट्र त्याचे स्वागत करेल, अशी भूमिका राजेंद्र कोंढरे यांनी मांडली. तसेच यावेळी छगन भुजबळ यांच्या अन्य ओबीसी नेत्यांच्या दुटप्पी भूमिकेवर टीका करण्यात आली. भुजबळ व त्यांच्या समता परिषदेकडून वेगळी भूमिका घेतली जात असल्याचे कोंढरे यांनी सांगितले. काही ओबीसी नेते मराठा विरुध्द ओबीसी असा वाद निर्माण करत आहेत. त्यांना मुख्यमंत्र्यांनी तंबी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

First Published on: November 29, 2020 11:57 PM
Exit mobile version