मुख्यमंत्र्यांनी घेतली मुख्य न्यायमूर्तींची सदिच्छा भेट; मराठा आरक्षणाबाबत चर्चा झाल्याची शक्यता

मुख्यमंत्र्यांनी घेतली मुख्य न्यायमूर्तींची सदिच्छा भेट; मराठा आरक्षणाबाबत चर्चा झाल्याची शक्यता

तोक्ते चक्रीवादळग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळग्रस्तांप्रमाणे नुकसानभरपाई देणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी सकाळी मुंबई उच्च न्यायालयात जाऊन मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांची सदिच्छा भेट घेतली. या दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. या भेटीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्य न्यायमूर्तीं दीपांकर दत्ता यांच्यात नेमकी कोणती चर्चा झाली याची माहिती मिळू शकली नाही. मात्र, दोघांमध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भात चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल आणि राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी हेसुद्धा उपस्थित होते. मुंबई उच्च न्यायालयात गेल्या तीन दिवसांपासून कोरोना लसीकरण सुरू असून त्याचा आढावा यावेळी आयुक्तांनी घेतल्याचे सांगण्यात आले.

शुक्रवारी मुख्यमंत्री ठाकरे आणि मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्यात साधारण अर्धा तास चर्चा झाली. या चर्चेचा अधिकृत तपशील देण्यात आलेला नाही. ही केवळ सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून मुंबई उच्च न्यायालयात कोरोना विषयक याचिकांवर सुनावणी सुरू आहे. न्यायमूर्तींनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला अनेक सूचना सातत्याने केल्या आहेत.

कोरोनाची सद्यस्थिती, ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरचा तुटवडा याबाबत सरकारने काय उपाययोजना केल्या आहेत. त्याचा तपशीलही वेळोवेळी न्यायालयाने राज्याचे महाधिवक्ता कुंभकोणी यांच्याकडून घेतला आहे. तसेच कोरोनाबाबतचे प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले होते.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी घेतलेली मुख्य न्यायमूर्तींची भेट महत्त्वाची मानली जाते. दरम्यान, या भेटीत मुख्यमंत्र्यांनी मुख्य न्यायाधीशांशी मराठा आरक्षणावरही चर्चा केल्याचे सांगण्यात येते. राज्याकडे मराठा आरक्षणाबाबत कोणते कायदेशीर पर्याय आहेत? आणि मराठा आरक्षणाबाबत कोणत्या मुद्द्यावर अधिक लक्ष केंद्रीत करायला हवे? यावरही या भेटीत चर्चा झाल्याचे कळते.

First Published on: May 14, 2021 8:21 PM
Exit mobile version