रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे मराठी अभिनेत्रीचा मृत्यू

रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे मराठी अभिनेत्रीचा मृत्यू

हिंगोलीतील सेनेगावात प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दुर्देवी घटना घडल्याचे समोर आले आहे. या घटनेमध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री पूजा झुंजार आणि तिच्या नवजात बाळांचा मृत्यू झाला आहे. या दुर्देवी घटनेमुळे पूजाच्या कुटुंबियांना धक्का बसला आहे.

नक्की काय घडले?

‘फाल्गुनराव जिंदाबाद’, ‘देवी माऊली आम्हा पावली’ यासारख्या मराठी चित्रपटांमध्ये २५ वर्षीय पूजाने भूमिका साकारल्या आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ती गरोदर असल्यामुळे चित्रपटात काम करत नव्हती. पूजाच्या जीवनात आलेल्या मातृत्वामुळे सर्व कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. शनिवारी रात्री उशीरा पूजाला प्रसूतीच्या कळा सुरू झाल्यामुळे तिच्या नातेवाईकांनी तिला प्राथमिक आरोग्य केंद्रावर दाखल केले. रविवारी पहाटेच्या सुमारास पूजाची प्रसुती झाली. पण काही वेळानंतर पूजाच्या बाळाचा मृत्यू झाला.

अभिनेत्री पूजा झुंजार

गावकऱ्यांनी प्रशासनाविरोधात केला संताप व्यक्त

त्यानंतर पूजाची प्रकृती खालावली. त्यामुळे तिला पुढील उपचारासाठी हिंगोलीमधील रुग्णालयात नेण्याचा डॉक्टरांकडून सल्ला देण्यात आला. मात्र पूजाला हिगोंलीतील रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती. म्हणून नातेवाईकांनी खासगी रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिकेचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र रुग्णवाहिका शोधण्यास उशीरा झाला आणि तिला हिगोंलीला नेत असताना तिचा वाटेतच मृत्यू झाला. हिंगोली जिल्ह्यातील आरोग्य विभागामध्ये पूजा आणि त्यांच्या नवजात बालकाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे सर्व गावकऱ्यांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे.

First Published on: October 22, 2019 11:41 AM
Exit mobile version