#LIVE साहित्य संमेलन : अतिशय देखण्या ग्रंथदिंडीला प्रारंभ; नाशिककरांचा अभूतपूर्व उत्साह

#LIVE साहित्य संमेलन : अतिशय देखण्या ग्रंथदिंडीला प्रारंभ; नाशिककरांचा अभूतपूर्व उत्साह

माय मराठीचा उत्सव अर्थात नाशिकच्या कुसुमाग्रज नगरीत होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासनं ग्रंथदिंडीने सुरूवात झालीय. अत्यंत थाटात हा सोहळा सुरू झालाय. आपण ग्रंथदिंडीचा हा सोहळा थेट माय महानगरच्या माध्यमातूनही बघू शकतात. कुसुमाग्रज प्रतिष्ठानपासून ग्रंथदिंडीला सुरुवात झाली.

नाशिक ढोलचा लयबद्ध ताल, मल्लखांबाचे रोमहर्षक प्रात्यक्षिके, चित्तथरारक मानवी मनोरे, लेझीमवर ताल धरणारे चिमुरडे, आकर्षक चित्ररथ, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज यांच्यासह मराठी सारस्वतांच्या वेशभूषा केलेले व पारंपारिक पेहराव केलेले विद्यार्थी, दिंडी मार्गावर काढण्यात आलेल्या सुंदर रांगोळ्या तसेच साहित्य आणि साहित्यिकांचा होणारा गजर अशा भारावलेल्या वातावरणात ही दिंडी निघाली. संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाठील, महापौर सतीश कुलकर्णी, संमेलनाचे समन्वयक समीर भुजबळ, आयोजक लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर, विश्वास ठाकूर, यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रंथ दिंडीला प्रारंभ झाला. साहित्य आणि शिक्षण यांचा फार जवळचा संबंध असून शिक्षक फक्त साहित्याचे अध्यापन करत नाही तर मातृभाषेचे जतन संवर्धन करत असतात.

साहित्य संमेलन हा विद्यार्थी जीवनातील अतिशय महत्वाचा बिंदू असून शिक्षक व विद्यार्थी या साहित्य संमेलनात मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत. ग्रंथ दिंडी हा साहित्य संमेलनातील महत्वाचा टप्पा आहे. त्यामुळे ही दिंडी यशस्वी करण्यासाठी संमेलनाच्या संयोजकांबरोबरच संस्था चालक, मुख्याध्यापक, शिक्षक यांनी पुढाकार घेतला आहे. भगूरच्या शिक्षणमंडळाने स्वा. सावरकर यांच्या जीवनावर आधारित अतिशय प्रेरणादायी देखावा साजर केला.

संमेलनात गुंजणार ’गर्जा जय जयकार’ चे स्वर

९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या ’गर्जा जय जयकार क्रांतीचा’ या स्वातंत्र्यसंग्रामातील लोकप्रिय कवितेचे स्वर गुंजणार आहेत.शुक्रवारी संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात ही कविता ४० युवा कलावंत सादर करणार आहेत. कुसुमाग्रज प्रतिष्ठानने या गीताची जबाबदारी घेतली असून गायक- संगीतकार मकरंद हिंगणे यांनी या गीताला स्वरमय केले आहे. प्रसिद्ध युवा कलावंत आशिष रानडे, ज्ञानेश्वर कासार, आनंद अत्रे, पुष्कराज भागवत, हर्षद वडजे, जाई कुलकर्णी आणि त्यांचे विद्यार्थी या गीताचे गायन करणार आहेत. १९४२ च्या नाशिक संमेलनात कुसुमाग्रज यांनी सादर केलेल्या या कवितेस फार मोठा प्रतिसाद मिळाला होता, याच संदर्भात नाशिक मधील साहित्य रसिकांकडून हे गीत उद्घाटनाच्या वेळी सादर केले जावे अशी मागणी होत होती. गीतासाठी तांत्रिक सहाय्य फिदरटच स्टुडिओचे शुभम जोशी यांनी केले आहे.

First Published on: December 3, 2021 11:47 AM
Exit mobile version