दुष्काळ निवारणासाठी बांबू शेतीचा मराठवाडा पॅटर्न

दुष्काळ निवारणासाठी बांबू शेतीचा मराठवाडा पॅटर्न

 कापुस, सोयाबीन, मुग, ज्वारी यासारख्या पिकांपुढे दुष्काळाच उभ राहणार संकट पाहता मराठवाड्यातील शेतकर्‍यांनी दुष्काळातून मुक्तीसाठी एक पॅटर्न राबवण्याचा निर्णय घेतला आहे. पाण्याची शाश्वती नसल्यानेच मराठवाड्यातील तीन तालुक्यांमध्ये बांबू शेतीचा पॅटर्न राबवण्यासाठी काही शेतकर्‍यांनी पुढाकार घेतला आहे. पिकातून उत्पन्नाची हमी मिळतानाच चांगला मोबदलाही बांबूच्या पिकातून मिळेल असा विश्वास या मॉडेलच्या निमित्ताने शेतकर्‍यांना वाटतो. बांबू शेतीतून तयार होणार्‍या उत्पादनांसाठी काही कंपन्याही संपर्कात आहेत अशी माहिती शेतकर्‍यांनी दिली.

परभणी, सेलू आणि मानवत या तीन जिल्ह्यातील सुमारे एक हजार शेतकरी आपल्या शेतात बांबुची शेती करणार आहे. बांबूच्या पिकाच्या जोडीलाच मिलिया डुबिया या वृक्षाची लागवड करण्यात येणार आहे. जवळपास ५० गावातील शेतकरी आपल्या एक हेक्टर शेतामध्ये प्रायोगिक तत्वावर या दोन्ही वृक्षांची लागवड करणार आहेत. सुरूवातीच्या तीन वर्षांमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेअंतर्गत शाश्वत अशी रक्कम बांबू लागवडीसाठी मिळणार आहे. पीक लागवडीच्या टप्प्यानुसार यासाठीचा मोबदला हा शेतकर्‍यांना देण्यात येणार आहे. बांबु शेतीतून चवथ्या वर्षापासून पीक येण्याची सुरूवात होते. त्यामुळेच तिन्ही तालुक्यातील एक हजार शेतकर्‍यांनी बांबू लागवडीसाठी मन घट्ट केले आहे. पावसाळी हंगामानंतर ठिबक सिंचनाचा वापर करून बांबूची रोप टिकवण्यात येतील.

येत्या जून महिन्यापासून बांबूची लागवड एक हजार शेतकर्‍यांच्या शेतात होईल. रोपटी लावण्यासाठी एप्रिल महिन्यापासूनच शेतात खड्डे घेण्यात येतील असे सेलू तालुक्यातील शेतकरी रमेश माने यांनी सांगितले. शेतकर्‍यांना वन विभागाकडून या बांबू लागवडीसाठी मोबदला मिळणार आहे. महाराष्ट्र बांबू विकास महामंडळाकडून इथेनॉल, बायो सीएनजी यासारख्या उत्पादनांसाठी शेतकर्‍यांना बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. आगामी ५० ते ६० वर्षे बांबूच्या पिकातून उत्पादन मिळेल तसेच जमीनीची धूप होणार नाही असा विश्वासही माने यांनी व्यक्त केला.

कापुस, सोयाबीन, मुग आणि ज्वारी यासारख्या पिकांसाठी मोठ्या प्रमाणावर खतांचा तसेच केमिकल फर्टीलायजरचा वापर होतो. पण बांबूच्या शेतीसाठी मात्र अशा कोणत्याही रसायनांचा वापर करावा लागत नाही असे विष्णु सोलंकी या शेतकर्‍याने सांगितले. बांबू लागवडीत बलकुवा या प्रजातीचा वापर करण्यात येणार आहे. यामधून इथेनॉल आणि बायो सीएनजी यासाठी उपयुक्त अस ग्लुकोजचे प्रमाण असल्याचे त्यांनी सांगितले. एका हेक्टरमध्ये १०० झाडांची लागवड शक्य आहे. पाण्याअभावी न परवडणार्‍या पिकांपेक्षा बांबूच्या शेतीची लागवड ही नक्कीच फायदा मिळवून देईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

First Published on: February 20, 2019 4:13 AM
Exit mobile version