नाशिकमध्ये आता पद्व्युत्तर मेडिकल कॉलेज

नाशिकमध्ये आता पद्व्युत्तर मेडिकल कॉलेज

Medical

राज्यातील वैद्यकीय कॉलेजांना मान्यता देणारे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकमध्ये असले तरी तिथे अद्यापपर्यंत एकही सरकारी मेडिकल कॉलेज नाही. त्यामुळे नाशिकमध्ये सरकारी मेडिकल कॉलेज सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने घेतला आहे. नाशिकमध्ये सुरू होणार्‍या पहिल्या पद्व्युत्तर मेडिकल कॉलेजमध्ये 100 जागा असून, पुढील शैक्षणिक वर्षापासून त्याची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे.

नाशिकमधील नागरिकांना अद्ययावत व उत्तमोत्तम आरोग्य सुविधा मिळावी यासाठी नाशिकमध्ये सुपरस्पेशालिस्ट मेडिकल कॉलेज सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मेडिकल कॉलेज नाशिक जिल्हा हॉस्पिटल व संदर्भ हॉस्पिटलच्या सहाकार्याने विद्यापीठामार्फत सुरू करण्यात येणार आहे. थेट पद्व्युत्तर कॉलेज सुरू करण्याचा मान देशामध्ये पंजाबनंतर थेट नाशिकला मिळाला आहे. पदवी अभ्यासक्रम चालवण्यात येत असलेल्या कॉलेजलाच पद्व्युत्तर कॉलेज सुरू करण्यास परवानगी मिळते.

परंतु नाशिकमध्ये पद्व्युत्तर कॉलेज सुरू करण्यास परवानगी मिळाल्याने नाशिककरांना याचा फायदा होणार आहे. पद्व्युत्तर कॉलेजमध्ये वरिष्ठ डॉक्टरांची नियुक्ती होणार असल्याने एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध होणार आहेत. त्यांना मोठ्या आजारासाठी किंवा शस्त्रक्रियेसाठी मुंबई किंवा पुण्यासारख्या शहरात जावे लागण्याचा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे.

नाशिकमध्ये सुरू होणार्‍या मेडिकल कॉलेजला सरकारकडून मान्यता मिळाली असून, त्यासाठी निधीही मंजूर झाला आहे. हा निधी लवकरच विद्यापीठाला मिळणार आहे. 2020 पासून हे कॉलेज सुरू करण्याचे उद्दिष्ट असून, त्यासाठी आवश्यक सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असल्याची माहिती महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी दिली.

पुढील वर्षीपासून मेडिकल कॉलेजच्या प्रवेशाला सुरुवात करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. त्यादृष्टीकोनातून आम्ही तयारी करत आहोत. सध्या 100 जागांची परवानगी मिळाली आहे.
– डॉ. दिलीप म्हैसेकर, कुलगुरू, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ

First Published on: August 1, 2019 5:58 AM
Exit mobile version