मेट्रो ३च्या ‘ऑपरेशन मिठी’ला सुरूवात

मेट्रो ३च्या ‘ऑपरेशन मिठी’ला सुरूवात

मिठी नदीच्या पाण्याचीही इंग्लंडवारी

मेट्रो ३ प्रकल्पाअंतर्गत अखेर मिठी नदीच्या खाली टनेल बोरिंग मशीन (टीबीएम) ऑपरेशनला सुरूवात झाली आहे. आतापर्यंत ४ मीटर ते ५ मीटर इतके अंतर टीबीएमच्या माध्यमातून गाठण्यात आले आहे. संपूर्ण मिठी नदीच्या क्षेत्रात खालोखाल टीबीएमच्या कामासाठी स्पेशल वॉटरप्रुफ गॅस्केटचा वापर करण्यात येत आहे.

मिठी नदीच्या वांद्रे (बीकेसी) भागातून टनेल बोरिंग मशीन उतरवण्यात आली होती. गेल्या रविवारपासून टीबीएमच्या कामाला सुरूवात झाली आहे. आतापर्यंत टीबीएमने ४ मीटर ते ५ मीटर इतके अंतर गाठले आहे. तर मिठी नदीचा तळ गाठण्यासाठी आणखी ११० मीटरचा पल्ला टीबीएम मशीनला गाठायचा आहे.

मेट्रो ३ प्रकल्पासाठी वापरण्यात येणार्‍या गॅस्केटच्या तुलनेत हे स्पेशल गॅस्केट अगदी दुप्पट आकाराचे आहे. मिठी नदीच्या खालोखाल पाण्याच्या परिसरातही सुरक्षित आणि वॉटर टाईट अशा पद्धतीची उपयुक्तता गॅस्केटच्या माध्यमातून शक्य होणार आहे. भूगर्भात काम करताना टनेलमधील अतिशय संवेदनशील भागासाठी हे गॅस्केट उपयुक्त ठरणार आहेत. एथिलिन प्रॉपिलीन डाइन मोनोमर (ईपीडीएम) या स्पेशल गॅस्केटचा वापर मिठी नदीच्या कामाअंतर्गत करण्यात येत आहे.

हे गॅस्केट साऊथ कोरियात तयार कऱण्यात आले आहे. तर स्पेशलाईज्ड गॅस्केट हे इंग्लंड येथील प्रयोगशाळेत तपासण्यात आले आहेत. मिठी नदीच्या पाण्याचा वापर या गॅस्केट तपासणीच्या कामादरम्यान करण्यात आला होता. हायड्रोफिलिक गॅस्केट तसेच पॉलिमेरिक गॅस्केटचा वापर हा अतिरिक्त सुरक्षिततेसाठी करण्यात येणार आहे.

असा होतो गॅस्केटचा वापर
ईपीडीएम गॅस्केट हे टनेलला आधार देणार्‍या रिंगला एडेसिव्हचा वापर करून चिटकवले जातात. रबर हॅमरचा वापर करून हे गॅस्केट अधिक मजबूत केले जातात. काही ठिकाणी स्क्रु देखील वापरून गॅस्केट अधिक वॉटर प्रुफ केले जाते.

मिठीचे पाणीही इंग्लंडमध्ये
स्पेशल गॅस्केटच्या तपासणीसाठी मिठी नदीच्या पाण्याचे नमुने हे इंग्लंड येथील लॅबमध्ये पाठवण्यात आले होते. पण हे पाणी नेतानाही एअरपोर्टवर अडचण निर्माण झाली होती. काही ठराविक मिली लीटर असे द्रव्य (लिक्विड) नेण्यासाठी विमानात परवानगी आहे. त्यामुळे मिठीचे तपासणीसाठी आणण्यात आलेले पाणी हे वेगवेगळ्या बॉटल्समध्ये भरून तपासणीसाठी नेण्यात आले. या पाण्याचा वापर करून गॅस्केटची तपासणी इंग्लंडच्या लॅबमध्ये करण्यात आली.

First Published on: June 6, 2019 4:08 AM
Exit mobile version