म्हाडाच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट, ठाणे-नवी मुंबईसाठी निघणार लॉटरी

म्हाडाच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट, ठाणे-नवी मुंबईसाठी निघणार लॉटरी

`

मुंबई – मुंबई आणि नजिकच्या शहरात घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाकडून (Kokan Mandal of Mhada) येत्या दहा दिवसांत २ हजार ४६ घरांची सोडत काढणार आहे. ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार महापालिकांच्या हद्दीत सोडत निघणार असून सोडतीची तयारी अंतिम टप्प्यात आहे.

म्हाडाच्या कोकण मंडळाने १४ ऑक्टोबर २०२१ रोजी ८ हजार ९८४ घरांची सोडत काढली होती. यावेळी दोन लाख ४६ हजारांहून अधिक इच्छुक अर्जदारांनी अर्ज केले होते. पात्रता निश्चितीनंतर विजेत्यांची नावे घोषित करण्यात आली होती. आता लागलीच वर्षभरात दुसऱ्यांदा सोडत जाहीर होणार आहे. सोडतीसाठी निकष आणि नवीन प्रणालीसाठी सोडत जाहीर झाली नव्हती. मात्र, अखेर आता काम पूर्णत्वास आले असून लवकरच सोडत जाहीर होणार आहे.

हेही वाचा– म्हाडाच्या कोकण मंडळाकडून चार हजार घरांची सोडत निघणार, पण कधी? लगेच वाचा

या सोडतीमध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी १ हजार १, अल्प उत्पन्न गटासाठी १ हजार २३, मध्यम उत्पन्न गटासाठी १८ तर उच्च उत्पन्न गटासाठी चार घरांचा समावेश आहे.

कोकण मंडळांसह पुणे आणि औरंगाबाद मंडळांतील घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. औरंगाबादेत अंदाजे ८००, पुण्यातील ४ हजार ६७८ घरांसाठी एकत्रित जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

१०० टक्के प्रक्रिया ऑनलाईन होणार

ऑनलाईन अर्जासाठी म्हाडाने नवी प्रणाली तयार करून घेतली आहे. त्यामुळे सोडतपूर्व आणि सोडतीनंतरची सर्व प्रक्रिया १०० टक्के ऑनलाईनच असणार आहे. अर्ज सादर करतानाच कागदपत्रेही सादर करावी लागणार आहेत. ज्यामुळे, सोडतीआधीच पात्रता निश्चिती करता येईल आणि पात्र अर्जदारच सोडतीत भाग घेऊ शकतील.

सोडतीत आरक्षण

म्हाडाच्या सोडतीत अनेकांना आरक्षणही मिळतं. पत्रकार, कलाकार, माजी सैनिक, स्वातंत्र्यसैनिकांसह अन्य गटांसाठीही आरक्षण देण्यात आले आहे. या आरक्षणातून अर्ज करताना प्रमाणपत्र सादर करावं लागतं. नव्या प्रणालीनुसार आता अर्ज करतानाच प्रमाणपत्र सादर करावी लागणार आहेत. जेणेकरून प्रमाणपत्राची छाननी होऊन सोडत जाहीर होणार आहे. ऑनलाईन छाननीमध्ये मानवी हस्तक्षेप टाळण्याकरता प्रमाणपत्राचा एक निश्चित नमुना प्रसिद्ध केला जाणार आहे.

काही दिवसांपूर्वी म्हाडा प्राधिकरणाने (MHADA) सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला होता. अल्प, अत्यल्प गटाच्या अनामत रकमेत (Deposit) कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय म्हाडाकडून घेण्यात आलाय. मात्र, मध्यम आणि उच्च उत्पन्न गटासाठी अनामत रक्कम वाढवण्यात येणार आहे. मात्र ही वाढ किती असेल हे अद्यापही सांगण्यात आलेले नाही. परंतु, घराच्या एकूण रकमेच्या एक टक्का किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम असण्याची शक्यता आहे.

First Published on: December 9, 2022 12:15 PM
Exit mobile version