MIM ची फुकटची ऑफर हा भाजपच्या व्यापक कटाचा भाग, संजय राऊतांचा पलटवार

MIM ची फुकटची ऑफर हा भाजपच्या व्यापक कटाचा भाग, संजय राऊतांचा पलटवार

मुंबईः एमआयएमकडून आलेली फुकटची ऑफर ही फुकटगिरी हा भारतीय जनता पक्षाच्या व्यापक कटाचा भाग आहे. राजकीय शत्रूला बदनाम करायचं. त्यांच्या विरोधात षडयंत्र रचायचं. त्यांच्या विषयी लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करायचा हा एक व्यापक कटाचा भाग आहे, असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणालेत. 22 मार्चपासून शिवसेनेच्या सुरू होणाऱ्या शिवसंपर्क अभियानाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे खासदार आणि जिल्हाप्रमुखांशी संवाद साधला. त्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय.

मेहबुबा मुफ्तीबरोबर सरकार कोणी स्थापन केलं?

भाजपकडून शिवसेनेविषयी जे गैरसमज पसरवले जात आहेत, त्यांचा जो उबळ, विष, जळफळाट आमच्याविषयी बाहेर पडतोय, त्यासंदर्भात उद्धव ठाकरेंनी मार्गदर्शन केले. कसली जनाब सेना, शिवसेना ही प्रखर हिंदुत्ववादी आहे. हिंदुत्ववादी होती आणि हिंदुत्ववादी राहील. शिवसेनेच्या हिंदुत्ववादात किंवा हिंदुत्वात कोणत्याही प्रकारची भेसळ ना झाली, ना आम्ही होऊ देणार. जे आम्हाला जनाब सेना म्हणतायत, त्यांनी त्यांचा इतिहास, त्यांची कर्तबगारी भूतकाळातून तपासून पाहावी. काश्मीरच्या संदर्भात आज जे आम्हाला अक्कल शिकवताहेत. काश्मीरमध्ये अतिरेक्यांशी हातमिळवणी करून सरकार स्थापन करणारा हाच भारतीय जनता पक्ष होता. मेहबुबा मुफ्तीबरोबर सरकार कोणी स्थापन केलं. आम्ही तेव्हाही ओरडत होतो की, हे पाकिस्तानवादी आहेत. हे फुटीरतावादी आहेत. हे अतिरेक्यांशी अफजल गुरूशी हातमिळवणी करणारे आहेत. यांच्याबरोबर सरकार स्थापन करून या देशातील हुतात्म्यांचा काश्मीरमधल्या हुतात्म्यांचा, काश्मिरी पंडितांच्या बलिदानाचा असा अपमान करू नका हे सांगणारे आम्ही आहोत. तेव्हा त्यांनी फार मेहबुबा मुफ्तींशी क्रांतिकारक अशी युती करून देशाला दिशा द्यायचा प्रयत्न केला. तेव्हा जनाब कोण, जनाब सेनावाले खरे कोण हे आम्ही आता महाराष्ट्रात जाऊन सांगू, असं म्हणत संजय राऊतांनी भाजपवर हल्लाबोल केलाय.

जे मुसलमानांच्या विरोधात भूमिका घेतील ते हिंदू नाहीत

मोहनराव भागवतांच्या संदर्भात उद्धव ठाकरेंनी एक उदाहरण दिलेलं आहे. सरसंघचालक मोहन भागवतांनी स्वतः सांगितलेलं आहे, या देशात जे मुसलमानांच्या विरोधात भूमिका घेतील ते हिंदू नाहीत. त्यांना हिंदू म्हणता येणार नाही हे आरएसएस प्रमुख सरसंघचालक मोहन भागवत यांनी अनेकदा त्यांच्या चिंतन शिबिरातून सांगितलेलं आहे. उद्धव ठाकरेंनी मार्गदर्शन करताना काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. अशा अनेक गोष्टी आहेत. आता जो काही प्रकार चाललेला आहे, एमआयएम आणि शिवसेना किंवा महाविकास आघाडीला युतीची ऑफर, पण मागितली कोणी हे भारतीय जनता पक्षाचे डावपेच आहेत. हे भाजपचं कारस्थान आहे. एमआयएम आणि भारतीय जनता पक्ष यांची आतून हातमिळवणी आहे. हे आतून छुपे रुस्तम आहेत. एमआयएमला भाजपनं आदेश दिलाय की, शिवसेनेची बदनामी करा. शिवसेनेच्या हिंदुत्वावरती प्रश्नचिन्ह निर्माण करा. त्यानुसारच एमआयएमचे महाराष्ट्रातले नेते ऑफर देतायत, आम्ही कुठे तुमच्याकडे आलोय, आम्हाला नकोय. शिवसेना कधीही एमआयएमबरोबर जाणार नाही. जे औरंगजेबाच्या कबरीपुढे जाऊन नतमस्तक होतात, अशा कोणत्याही पक्षासोबत शिवसेनेचा संबंध कधी नव्हता आणि राहणारही नाही. हा संबंध जर कोणाचा असेल तर तो भारतीय जनता पक्षाचा आहे हेसुद्धा उद्धव ठाकरेंनी मार्गदर्शन करताना स्पष्ट केलंय. हा एक व्यापक कटाचा भाग आहे, असंही संजय राऊतांनी सांगितलंय.

लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करायचा हा एक व्यापक कटाचा भाग

राजकीय शत्रूला बदनाम करायचं, त्यांच्या विरोधात षडयंत्र रचायचं. त्यांच्या विषयी लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करायचा हा एक व्यापक कटाचा भाग आहे. त्यानुसारच कालपासून त्यांनी एमआयएमच्या लोकांना आमची बदनामी करण्यासाठी सोडलंय. पण या व्यापक कटासंदर्भात शिवसेना सावध आहे. महाराष्ट्राची जनता सावध आहे. या व्यापक कटाचे सूत्रधार हे भारतीय जनता पक्षाची लोक आहेत आणि आम्ही हा कट उधळून लावलेला आहे. खासदार म्हणून ते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. त्याच्या विभागातील काही विकासाचे प्रश्न असतील, तर कोणताही खासदार हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटू शकतो, असंही ते म्हणालेत.

आम्ही सगळे 19 जिल्ह्यांत जात आहोत : संजय राऊत

आता शिवसेना भवनात मुंबई किंवा ठाण्यातल्या सगळे प्रमुख पदाधिकारी आम्ही खासदार, नेते असे बसलो. शिवसेनेकडून शिवसंपर्क मोहीम 22 तारखेपासून विदर्भ आणि मराठवाड्यात सुरू होतेय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आदेशानं ही मोहीम सुरू करतोय. त्यासंदर्भात काही मार्गदर्शनपर चर्चा झाल्या. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही जोरदार असं मार्गदर्शन केलं. आम्ही सगळे 19 जिल्ह्यांत जात आहोत. मी स्वतः नागपूरला जातोय. इतर खासदार आपापल्या जिल्ह्यांत टीम घेऊन जात आहेत. चार दिवस जिल्ह्यांचं वातावरण हे ढवळून काढायचंय, असंही त्यांनी अधोरेखित केलंय.


हेही वाचाः …तर जम्मू-काश्मीरमध्ये CRPF ची गरज लागणार नाही, केंद्रीय गृहमंत्री शहांचं मोठं वक्तव्य

First Published on: March 20, 2022 1:52 PM
Exit mobile version