विजय वडेट्टीवारांची नाराजी उघड, विशेष अधिवेशनात अनुपस्थित!

विजय वडेट्टीवारांची नाराजी उघड, विशेष अधिवेशनात अनुपस्थित!

महाविकासआघाडीचं सरकार आल्यापासून आधी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आणि त्यानंतर खातेवाटप या गोष्टी विशेष चर्चेत राहिल्या. मात्र, त्यानंतरही सर्वाधिक चर्चा रंगली ती तिन्ही पक्षांमधल्या नाराजांची. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या नवनिर्वाचित आमदारांमध्ये काही प्रमाणात मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराजी असल्याचं दिसून आलेलं असतानाच आता मंत्रिपद मिळालं असून देखील ते आवडीचं न मिळाल्यामुळे काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार नाराज असल्याचं उघड झालं आहे. या नाराजीमुळेच ते आज अनुसूचित जाती-जमातीसाठी असलेल्या आरक्षणाला मुदतवाढ देण्यासाठी बोलावण्यात आलेल्या विशेष अधिवेशनाला गैरहजर राहिल्याचं पाहायला मिळालं. काँग्रेसकडून गेल्या दोन दिवसांपासून वडेट्टीवार यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न होऊन देखील त्यात अपयश आल्याचंच आजच्या वडेट्टीवार यांच्या अनुपस्थितीवरून दिसून येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

मंत्रिमंडळ बैठकीलाही वडेट्टीवारांची गैरहजेरी

विजय वडेट्टीवार यांच्याकडे इतर मागासप्रवर्ग, शैक्षणिक व सामाजिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास आणि भूकंप व पुनर्वसन ही खाती देण्यात आली आहेत. मात्र, मिळालेल्या खात्यावर वडेट्टीवार नाराज असल्याचं वृत्त आहे. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीला देखील वडेट्टीवार यांनी दांडी मारली होती. याआधी देखील भास्कर जाधव, अब्दुल सत्तार अशा आमदारांनी नाराजी बोलून दाखवली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना नाराजांची मनधरणी करण्याची मोठी कसरत करावी लागत असल्याचं चित्र सध्या महाराष्ट्रात दिसत आहे.

First Published on: January 8, 2020 12:05 PM
Exit mobile version