श्रद्धांजली कार्यक्रमात अल्पवयीन मुलीची काढली छेड

श्रद्धांजली कार्यक्रमात अल्पवयीन मुलीची काढली छेड

प्रातिनिधिक फोटो

पुलवामा हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्याच्या कार्यक्रमात एका अल्पवयीन मुलीची छेड काढल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणातील आरोपी फरार झाला आहे. आरोपीचे नाव स्पष्ट झाले नसून, त्याचा फोटो मात्र पोलिसांना मिळाला आहे. मात्र श्रद्धांजली कार्यक्रमात अशा प्रकारची घटना घडल्यामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. सदर बाब अमरावती जिल्ह्यातील कार्यक्रमादरम्यान घडली.

कसा घडला प्रकार

फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या व्यकंटेश कॉलनी परिसरात १५ फेब्रुवारीला सायंकाळी पुलवामा हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. अंधार पडल्यावर हा कार्यक्रम सुरू असताना अचानक वीज पुरवठा खंडित होऊन काळोख पसरला. अंधाराचा फायदा घेत एका युवकाने कार्यक्रमात सहभागी झालेल्या अल्पवयीन मुलीची छेड काढली. या प्रकारामुळे चांगलीच खळबळ उडाली. युवतीची छेड काढणारा नेमका कोण आणि कुठला होता हे स्पष्ट झाले नसले तरी त्याचा कार्यक्रमातील फोटो मुलीच्या वडिलांना मिळाल्यानंतर गुरुवारी सायंकाळी मुलीच्या वडिलांनी पोलिसात लेखी तक्रार दाखल केली. वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी अज्ञात युवकाविरुद्ध पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी फरार झालेल्या अज्ञात आरोपीचा फोटो व्हायरल करून त्याचा शोध सुरु केला आहे.

 

First Published on: March 1, 2019 2:47 PM
Exit mobile version