29 आणि 30 एप्रिलला मुंबईतील हौसिंग सहकाराची मोठी परिषद, दरेकरांची घोषणा

मुंबई : येत्या 29 आणि 30 एप्रिल या दोन दिवसांत सोमय्या मैदानावर संपूर्ण मुंबईतील हौसिंग सहकाराची मोठी परिषद होणार असल्याची घोषणा विधान परिषदेतील भाजपा गटनेते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी सोमवारी केली. या परिषदेला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार असल्याचेही प्रवीण दरेकर यांनी सांगितले.
हौसिंग फेडरेशन आयोजित मुंबईतील गृहनिर्माण सहकारी संस्थांकरिता मार्गदर्शन शिबिराचे कांदिवलीतील आर्य समाज हॉल येथे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे अध्यक्षस्थान आमदार प्रवीण दरेकर यांनी भूषविले. त्यावेळी दरेकर यांनी ही घोषणा केली. ते म्हणाले की, आज हौसिंग सोसायट्यांचे अनेक प्रश्न आहेत. मुंबईत रजिस्टरही नसलेल्या हजारोंच्या संख्येने संस्था आहेत. या सर्व सोसायट्यांचे वेगवेगळे प्रश्न आणि त्या प्रश्नाला उत्तर कसे काढता येईल या प्रमुख उद्देशाने अशा प्रकारची चर्चा, मार्गदर्शन होत आहे.
आज आपल्या सर्वाना हवासा वाटणारा विषय म्हणजे ‘सेल्फ डेव्हलपमेंट’. ही संकल्पना ज्या दिवशी आम्ही आणली त्यावेळेला अनेक लोकांनी म्हटले हे शक्य आहे का? परंतु आम्ही जिल्हा बँकेच्या माध्यमातून निर्धार केला. माणसे तर तीच आहेत, व्यवस्थाही तीच आहे, मग सोसायटीला पुनर्विकास का करता येत नाही? तर त्याची कारणे फक्त दोनच आहेत. एक म्हणजे त्यांच्याकडे पैसे नसतात, आर्थिक पाठबळ नसते आणि दुसरे कारण असते त्यांना ज्या ठिकाणी यंत्रणांकडून एनओसी, परवानग्या मिळवाव्या लागतात. हे सर्व ध्यानी घेऊन बिल्डर आला की आपले काम संपले, एवढाच विचार केला जातो. मग आम्हाला कमी पैसे मिळाले, कमी जागा मिळाली तरी चालेल, एवढ्यावरच आपला मध्यमवर्गीय माणूस समाधानी आहे. परंतु त्यांना आर्थिक पाठबळ दिले आणि ज्या एनओसी संदर्भात एक खिडकी यंत्रणा उभी करून सरकारने काही नियम बनविले तर स्वयंपुनर्विकास होऊ शकतो, यावर माझा ठाम विश्वास होता. आता तो यशस्वी होताना दिसत असल्याचे दरेकर म्हणाले.
आज पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहनिर्माण, फेडरेशन खाते आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींची गतीने अंमलबजावणी निश्चितपणे होणार आहे, हा विश्वास व्यक्त करत दरेकर म्हणाले, जवळपास 20 ते 25 सोसायट्यांना आम्ही कर्ज दिले आहे. जी 400 चौफुटाच्या जागी 450 चौरसफूट जागा द्यायला बिल्डर नाकारत होता, त्याठिकाणी आज 800 स्क्वे. फूट घरात हा मध्यमवर्गीय माणूस राहायला गेला आहे. हे स्वप्न नाही तर कृती झाली असल्याचे ते म्हणाले. यावेळी दरेकर यांनी गोरेगाव येथील अजितकुमार सोसायटीचे उदाहरण दिले.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे की, सेल्फडेव्हलपमेंटबाबत एक परिपूर्ण धोरण तयार करावे आणि फडणवीस यांनी हा विषय अत्यंत जिव्हाळ्याचा, संवेदनशीलतेने घेतला आहे. कुठेतरी मध्यमवर्गीयांना फायदा होतो हे त्यांच्या लक्षात आले आहे. म्हणून त्यांनी गृहनिर्माणच्या सचिव वलसा नायर यांना स्वयंपुनर्विकासाबाबत सर्वंकष धोरण बनवावे, अशा प्रकारचा आदेश दिला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
शासकीय दरबारी वेगवेगळ्या परवानग्यांसाठी अडचणी येत होत्या. या व्यवस्थेतील अधिकाऱ्यांना ज्या प्रकारे सहकार्य व्हायला हवे तसे होत नाही. तथापि जिथे जिथे अडचणी येत आहेत तिथे स्वतः मी लक्ष घालतोय. आता गतिमान सरकार आले आहे. पहिल्यासारखे थांबायला, वाट पाहायला वेळ नाही. सर्व अडचणी दूर करून आपली स्वयंपुनर्विकास मोहीम ताकदीने पुढे नेणार आहोत, असेही दरेकर म्हणाले.
जेवढे पैसे लागतील तेवढे आम्ही उभे करू तुम्ही चिंता करायचे कारण नाही. राज्य सहकारी बँक, मुंबई जिल्हा बँक आणि इतर सक्षम बँका यांचे एकत्रिकरण करून पैसा उपलब्ध करू. मी देवेंद्र फडणवीस यांना सांगितले आहे की महाराष्ट्र हौसिंग फायनान्स कॉर्पोरेशन बंद आहे. आपण सेल्फ डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन काढावे. त्या माध्यमातून अर्थपुरवठा करावा, असे त्यांनी नमूद केले.
येत्या 29 आणि 30 एप्रिलला सोमय्या मैदानावर संपूर्ण मुंबईतील हौसिंग सहकाराची मोठी परिषद होणार आहे. या परिषदेला राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. 500 रुपये त्याची प्रवेश शुल्क ठेवण्यात आले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
या शिबिराला अनिल कवडे, मिलिंद बोरीकर, कैलास जेबले, शिवाजीराव नलावडे, नंदकुमार काटकर, अभिषेक घोसाळकर, जयश्री पांचाळ, प्रकाश दरेकर, डी. एस. वडेर, डी. एन. महाजन, श्रीकांत कवठणकर, आनंद माईंगडे, विजय शेलार यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते.
सर्वसामान्यांसाठी हे सरकार निश्चितपणे मदत करणार
सेवाशुल्काच्या विषयावर बोलताना दरेकर म्हणाले की, याचा उल्लेख मी विधिमंडळाच्या सभागृहात केला. सेवाशुल्कही कमी करावे लागणार आहे. जी दुकाने असतात त्यांना व्यावहारिकदृष्ट्या मदत होणार आहे. याबाबत सविस्तर निवेदन देऊ किंवा सरकार पातळीवर उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे बैठकही लावू. जेणेकरून सरकारचे आदेश, मान्यता हवी असेल तर निश्चितच ती मिळवू. सरकार पैसे उपलब्ध करते, पण सरकारलाही काही मर्यादा आहेत. जेजे म्हणून देता येईल ते सर्वसामान्य माणसांसाठी सरकार म्हणून आम्ही निश्चितपणे करू, असा विश्वास दरेकर यांनी व्यक्त केला.

First Published on: March 27, 2023 7:30 PM
Exit mobile version