महिलेच्या लैंगिक शोषणाच्या आरोपामुळे आमदार गणेश नाईक अडचणीत; महिला आयोगाची नोटीस

महिलेच्या लैंगिक शोषणाच्या आरोपामुळे आमदार गणेश नाईक अडचणीत; महिला आयोगाची नोटीस

मुंबईः भाजप नेते आणि आमदार गणेश नाईक एका महिलेनं केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपामुळे अडचणीत सापडलेत. विशेष म्हणजे या प्रकरणाची राज्य महिला आयोगानंही दखल घेतलीय. राज्य महिला आयोगानं नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना तपास करून दोन दिवसांत अहवाल देण्याचे आदेश दिलेत. राज्य महिला आयोगानं ट्विटवरून यासंदर्भात माहिती दिलीय.

पीडिता 1993 पासून लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये

नवी मुंबई येथील एका महिलेने ऐरोलीचे भाजप आमदार गणेश नाईक यांच्या विरोधात केलेला तक्रार अर्ज महाराष्ट्र राज्य महिला आयोगास प्राप्त झालेला आहे. त्यामध्ये पीडित महिलेने अशी तक्रार केली आहे की, ऐरोली विधानसभेचे आमदार गणेश नाईक यांच्यासोबत पीडिता 1993 पासून लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत आहेत, सदर संबंधातून त्यांना 15 वर्षांचा मुलगा आहे.

महिलेच्या आणि त्यांच्या मुलाच्या जीवितास धोका

या महिलेने त्यांचे वैवाहिक अधिकार तसेच त्यांच्या मुलाकरिता पितृत्वाचा अधिकार मागितला असता गणेश नाईक यांनी या महिलेस आणि मुलाला जीवे मारण्याची धमकी देत आहेत. त्यामुळे या महिलेच्या आणि त्यांच्या मुलाच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. या महिलेने दाखल केलेली तक्रार गंभीर स्वरूपाची असून, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने त्याची दखल घेतली आहे. यावर योग्य कारवाई तात्काळ करून त्याचा अहवाल 48 तासांच्या आत सादर करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत.

संदीप नाईक यांचीही पीडित महिलेला ठार मारण्याची धमकी

विशेष म्हणजे या प्रकरणात गणेश नाईक यांचा मुलगा संदीप नाईक यांनीही पीडित महिलेला त्यांच्यासोबत असलेले संबंध संपवण्यास सांगितले असून, महिलेला ठार मारण्याची धमकीही दिली होती, असा आरोप महिलेकडून करण्यात येत आहे. नेरूळ पोलिसांकडे याबाबत तक्रार करूनही कारवाई होत नाही. त्यामुळे गुन्हा नोंद व्हावा आणि पोलीस संरक्षण मिळावं, या मागणीसाठी पीडित महिलेने राज्य महिला आयोगाकडे अर्ज केलाय.


हेही वाचाः आर्यन खान ड्रग्ज प्रकरण : 2 NCB अधिकाऱ्यांचे निलंबन, मुख्य तपास अधिकाऱ्यासह गुप्तचर अधिकारी निलंबित

First Published on: April 13, 2022 9:10 PM
Exit mobile version