Jitendra Awhad : जो नाही झाला बापाचा, तो काय होणार…; शरद पवार गटाकडून आनंद परांजपेंना जोरदार टोला

Jitendra Awhad : जो नाही झाला बापाचा, तो काय होणार…; शरद पवार गटाकडून आनंद परांजपेंना जोरदार टोला

ठाणे – राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरुच आहे. अजित पवार गटाचे आनंद परांजपे आणि नजीब मुल्ला यांनी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर आरोप केले होते, त्याला प्रत्युत्तर देत, जो नाही झाला बापाचा; जो नाही झाला ठाकरे-शिंदेंचा; जो नाही झाला आव्हाडांचा, तो काय होणार अजित पवारांचा? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांनी केला.

स्वतःचे महत्त्व वाढवण्यासाठी आव्हाडांवर आरोप

सुहास देसाई म्हणाले की, महायुतीमध्ये आनंद परांजपे आणि नजीब मुल्ला या दोघांना अजिबात महत्त्व नाही. त्यामुळे स्वतःचे अस्तित्व दाखविण्यासाठी आणि महत्त्व वाढवण्यासाठी परांजपे आणि मुल्ला यांचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे. ठाण्यात सुरु असलेल्या बांधकामांचे, बिल्डर्सचे प्लॅन अडवून ठाणे महापालिकेच्या चौथ्या मजल्यावरून वसुली कोण करतो? असा सवाल राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांनी केला.

सुहास देसाई म्हणाले की, आनंद परांजपे यांना महायुतीतच काय तर त्यांच्या पक्षातही महत्व नाही. त्यामुळेच जितेंद्र आव्हाड यांच्यावर उठसूठ टीका करून महत्व वाढविण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. जितेंद्र आव्हाड हे दोन वेळा कॅबिनेट मंत्री होते. पण, त्यांनी कधीच कुणाकडून पैसे उकळले नाहीत. पण, पालिकेतील चौथ्या मजल्यावर बसून बिल्डरचे प्लॅन अडवून किती पैसे उकळले जातात, हे ठाण्यातील जनतेला माहित आहे.

दाऊदच्या भावाबरोबर कोण बिर्याणी खात होता?

मुंब्रा येथील बिल्डरला कसा त्रास देण्यास सुरूवात केली? परमार बिल्डरला कुणामुळे आत्महत्या करावी लागली होती? कोण दाऊदच्या भावाबरोबर बिर्याणी खात होता? मुल्ला यांचे दाऊदसोबत सबंध आहेत, असे वरिष्ठ आयपीएस अधिकारी परमबिर सिंह यांनी जाहीरपणे कसे काय सांगितले होते? असे सवाल करत शरद पवार गटाने परांजपे आणि नजीब मुल्लांवर गंभीर आरोप केले आहेत.

शानू पठाण यांना मारण्याची सुपारी जावेद बटला या मुंब्रा येथील व्यक्तीला कोणी दिली होती? कुणाच्या ऑफिसमध्ये इसीसचा सदस्य कामाला होता? एवढेच नाही तर ज्या कोकण मर्कंटाईल बँकेचा कारभार नजीब मुल्ला पहात आहेत; त्या बँकेत कोट्यवधी रूपयांची अफरातफर झाल्याची तक्रार एका मुस्लीम बांधवाने केली होती. त्याची चौकशी कोणी थांबविली? अशी प्रश्नांची सरबत्ती करत आम्हाला तोंड उघडायला लावू नका, असा इशारा सुहास देसाई यांनी दिला.

आनंद परांजपे यांनी आमच्या नेत्याचा कपटी मित्र असा उल्लेख केला आहे. त्यांना हेच विचारायचे आहे की तुम्हाला आणि तुमच्या पत्नीला कोविड झाला तेव्हा तुमचे बिल कोणी भरले होते, याची जरा जाण ठेवा आणि नंतर कपट हा शब्द वापरा, असे सुहास देसाईंनी म्हटले आहे. कार्यालयातील खाणं-पिणं, नाश्ता याचे पैसे कुठून जायचे. तेव्हा जितेंद्र आव्हाड यांनी तुम्हाला पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळले होते, याची तरी जाण परांजपेंनी ठेवायला हवी, असा टोलाही देसाई यांनी लगावला.

विक्रम खामकर यांनी, गद्दार गटाचे आनंद परांजपे यांनी राज्यसभेची उमेदवारी मिळावी म्हणून गाड्या भरून माणसे अजित पवार यांच्या बंगल्यावर नेली होती. पण, त्यांचे नावही कुणी घेतले नाही. लोकसभेला तर किंचीतसा उल्लेखही झालेला नाही. पक्षात किमंत नसल्याने ते नैराश्यातून अशी बेताल वक्तव्ये करीत आहेत. त्यांनी केलेल्या गद्दारीमुळे दिवंगत खासदार प्रकाश परांजपे यांच्या पत्नी म्हणजेच आनंद परांजपेंच्या मातोश्रीही त्यांना मत देणार नाहीत, अशी टीका केली.

हेही वाचा : Jitendra Awhad : मविआबाबत आव्हाडांनी प्रकाश आंबेडकरांना हात जोडून केली विनंती, म्हणाले…

First Published on: March 27, 2024 8:08 PM
Exit mobile version