शेतकर्‍यांच्‍या प्रश्‍नावर आमदार भिडले

शेतकर्‍यांच्‍या प्रश्‍नावर आमदार भिडले

राज्यातील अवकाळीग्रस्त शेतकर्‍यांना तातडीची हेक्टरी 25 हजारांची मदत आजच घोषित करण्याच्या मागणीवरून मंगळवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी अभूतपूर्व गोंधळ घातला. विधानसभेत दै.सामनाचे बॅनर मुख्यमंत्र्यांसमोर फडकावत भाजप आमदारांनी प्रचंड गोंधळ घातला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज दोनवेळा थांबवण्यात आले. बॅनर उद्धव ठाकरेंसमोर फडकावल्याने शिवसेना आमदारही संतापले. विधानसभा अध्यक्षांनी सांगितल्यानंतरही सामनाचे बॅनर भाजप आमदारांनी दूर न केल्याने शिवसेनेचे आमदार थेट भाजप आमदारांवर सभागृहात धावून गेले. दोन्ही बाजुंच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की झाल्याने सभागृहात मोठा तणाव निर्माण झाला. या गदारोळात चार विधेयक मंजूर करून घेत सभागृहाचे कामकाज एका तासात गुंडाळण्यात आले.

विधानसभेत कामकाजाला सुरुवात होताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अवकाळीग्रस्त शेतकर्‍यांना हेक्टरी 25 हजार रूपयांची मदत करावी आणि मुख्यमंत्र्यांनी शेतकर्‍यांना दिलेला शब्द पाळावा, अशी मागणी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांच्या मागणीची आठवण करून देण्यासाठी भाजपच्या आमदारांनी दैनिक सामनामधील वृत्ताचे कात्रण असलेले कापडी बॅनर सभागृहात फडकवला. या बॅनरवरून दोन्ही बाजूंच्या आमदारांमध्ये जोरदार घोषणायुद्ध सुरु झाले. भाजप आमदार अभिमन्यु पवार व नारायण कुचे यांनी हा बॅनर मुख्यमंत्री थेट उद्धव ठाकरे यांच्यासमोर धरला. त्यानंतर अर्थमंत्री जयंत पाटील बोलायला उभे राहिल्यानंतर त्यांनाही बॅनर दाखवण्यात आला. या बॅनरमुळे शिवसेना आमदार संतापले. शिवसेनेचे संजय रायमुलकर यांनी भाजप आमदारांच्या हातातील बॅनर हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात शिवसेना व भाजप आमदारांमध्ये जोरदार बाचाबाची होऊन दोघांनी एकमेकांच्या अंगावर धावुन जाण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेचे भास्कर जाधव व राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांनी मध्यस्थी करीत दोन्ही बाजुच्या आमदारांना शांत ठेवण्याचा प्रयत्न केला. या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज दोनवेळा तहकूब करावे लागले.

बॅनरबाज आमदारांना अध्यक्षांची समज
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सभागृहात फलकबाजीची गंभीर दखल घेत आमदारांना समज दिली. आजची घटना चुकीची आणि न शोभणारी आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला आपली भूमिका मांडावी लागते. परंतु, नेत्यांसमोर फलक फडकवणे ही दुर्देवी घटना आहे. भूमिका मांडताना एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याची गरज नाही, असे पटोले यांनी बजावले.

उद्धव ठाकरेंनी शब्द पाळावा                                                                                              ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात राज्यात झालेल्या अवकाळी पावासाचा फटका शेतकर्‍यांना बसला होता. त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकर्‍यांच्या बांधावर जात त्यांचे दु:ख समजवून घेतले होती. त्यावेळी त्यांनी शेतकर्‍यांना हेक्टरी 25 हजार रूपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी केली होती. या मागणीचा संदर्भ देत फडणवीस यांनी ठाकरे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. पुरवणी मागणीत शेतकर्‍यांच्या तोंडाला सरकारने पाने पुसली आहेत. उद्धव ठाकरे नेहमी दिलेला शब्द पाळत असल्याने त्यांनी तात्काळ मदत जाहीर करावी, अन्यथा आम्ही कामकाज चालू देणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला. मात्र अध्यक्षांनी झालेल्या प्रकाराबाबत दोन्ही बाजूच्या सदस्यांना कडक समज दिल्यानंतर सभागृहात झालेल्या गोंधळाबद्दल फडणवीस यांनी खेद व्यक्त केला. सभागृहात सदस्य संयमाने वागतील, कोणी कोणाच्या अंगावर जाणार नाही, याची हमी फडणवीस यांनी दिली. तर अध्यक्षांनी या गोंधळातच चार विधेयके मंत्र्यांकडून मांडून घेत ती आज मंजूरही करण्यात आली.

First Published on: December 18, 2019 5:55 AM
Exit mobile version