Hanuman Chalisa: मनसे पदाधिकाऱ्यांना पोलीसांकडून नोटीस, मनसेने दिली प्रतिक्रिया

Hanuman Chalisa: मनसे पदाधिकाऱ्यांना पोलीसांकडून नोटीस, मनसेने दिली प्रतिक्रिया

मनसे अध्यश्र राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारला ३ मे पर्यंत मशीदीवरील भोंग काढून टाकण्याचा अल्टीमेटम दिला आहे. मशीदीवरील भोंगे काढा नाही तर आम्ही हनुमान चालीसा लाऊड स्पीकरवर लावुन पठण करू असे आवाहन राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. राज ठाकरे यांनी दिलेल्या चेतावणीच्या निमित्ताने आता मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून नोटीस देण्याची सुरूवात झाली आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी पदाधिकाऱ्यांना आलेली नोटीस ट्विट केली आहे. त्याचवेळी शिवसेनेला डिवचण्याचाही प्रयत्न केला आहे.

मनसेचे कल्याण जिल्हा अध्यक्ष उल्हास भोईर यांना खडकपाडा पोलीस ठाण्याकडून नोटीस बजावण्यात आली आहे. आपण अथवा आपले कार्यकर्ते आणि समर्थक प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष विना परवाना एकत्र जमवुन व गर्दी होईल असे कार्यक्रम आयोजित करू नये. तसेच कोणत्याही धर्माच्या किंवा जातीच्या भावना दुखावू नये असे कृत्य करू नये अशी नोटीस त्यांना बजावण्यात आली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन सार्वजनिक शांतता भंग होईल असे वर्तन करू नये, असेही आवाहन पोलिसांनी केले आहे.

या नोटीशीनंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपणास जबाबदार धरण्यात येईल. तसेच कायदेशीर कारवाईही करण्यात येईल असे कल्याण पोलिसांनी सीआरपीसी १४९ न्वये नोटीस दिली आहे.

मनविसेचे उपाध्यक्ष चेतन पेडणेकर यांनाही शिवडी पोलिसांनी नोटीस बजावली आहे. चेतन पेडणेकर यांनी अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर हनुमान मदीर शिवडी येथे महाआरती करण्यासाठी तसेच ४ मे रोजी हनुमान चालीसा पठण करण्यासाठी लाऊडस्पीकर लावण्याची परवानगी मागितली होती. पण १० एप्रिल ते ९ मे पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी पेडणेकर यांना दिली आहे. तसेच १४९ अंतर्गत नोटीसही बजावली आहे.

पदाधिकाऱ्यांना बजावण्यात आलेल्या नोटीसांवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रामचंद्र कह गये सिया से, ऐसा कलयुग आएगा, शिव की सेना कहलाने वाले हनुमान चालिसा से डर जाएगा असे ट्विट संदीप देशपांडे यांनी केले आहे.


 

First Published on: April 30, 2022 12:24 PM
Exit mobile version