अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपची अखेर माघार, राज ठाकरेंनी मानले आभार

अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपची अखेर माघार, राज ठाकरेंनी मानले आभार

अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपच्या मुरजी पटेल यांनी माघार घेतल्याने उद्धव ठाकरेंच्या गटातील उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. मुरजी पटेल यांनी शेवटच्या दिवशी अर्ज मागे घेतल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. भाजपने उमेदवार मागे घ्यावा अशी विनंती सर्वप्रथम मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रातून केली होती. यानंतर भाजप नेत्यांनी तातडीने बैठक घेत आपला उमेदवार मागे घेतला. यानंतर राज ठाकरे यांनी भाजपच्या निर्णयाचे स्वागत करत नेत्यांचे आभार व्यक्त केले आहेत. राज ठाकरेंनी भाजप नेत्यांचे आभाराचे पत्र ट्विटवर ट्विट केले आहे.

राज ठाकरेंचे पत्र जसच्या तस

प्रिय मित्र देवेंद्रजी, सस्नेह जय महाराष्ट्र ! काल मी केलेल्या विनंतीला मान देऊन आपण अंधेरी (पूर्व) च्या पोट-निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतलात ह्याबद्दल आपले, आपल्या सहकाऱ्यांचे आणि पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळींचे शतश: आभार.

चांगली, सकारात्मक राजकीय संस्कृती ही सुदृढ समाजासाठी आवश्यक असते. अशी राजकीय संस्कृती असावी, वाढावी आणि राजकीय मंचावर आपापले मुद्दे घेऊन राजकीय पक्षांनी निकोप स्पर्धा करावी असा प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही कायम करत असतो. त्याला आज तुम्ही प्रतिसाद दिलात ह्याबद्दल तुम्हा सर्वांचे पुनःश्च आभार.. असं राज ठाकरे यांनी पत्रात नमूद केले आहे.

राज ठाकरे यांच्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनीही ही भाजपने उमेदवार मागे घ्यावा अशी मागणी केली होती. ज्यानंतर भाजप नेत्यांनी काल आणि आज सकाळी तातडीने बैठका घेत आपला उमेदवार मागे घेतला. यामुळे आता शिवसेना उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग सुखरूप झाला आहे.


भाजपा अंधेरी पोटनिवडणूक लढवणार का? मध्यरात्री नेत्यांची खलबतं, बैठकीत काय ठरलं?

First Published on: October 17, 2022 2:18 PM
Exit mobile version