Video: ‘मनसे’च्या गाण्यावर आमदाराचा ‘भाजप’मध्ये प्रवेश!

Video: ‘मनसे’च्या गाण्यावर आमदाराचा ‘भाजप’मध्ये प्रवेश!

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपात आणि शिवसेनेत मेगाभरती चालू आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते सत्ताधारी पक्षात प्रवेश करत आहेत. शनिवारी सर्वाधिक चर्चेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यासह त्यांचे वडिल आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते डॉ. पद्मसिंह पाटील हेदेखील भाजपात प्रवेश करणार आहे. उस्मानाबादमध्ये कार्यकर्ता मेळावा घेऊन आज राणा जगजितसिंह पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहे.

या कार्यकर्ता मेळाव्यात चक्क कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी मनसेचं गाणं वाजवण्यात आलं. हे गाणं मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दरम्यान मनसेचं प्रचार गीत म्हणून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी प्रकाशित केलं होतं. ‘तुमच्या राजाला साथ द्या’ हे गाणं सुप्रसिद्ध गायक स्वप्निल बांदोडकर आणि अवधुत गुप्ते यांनी गायलं आहे. हे गाणं त्यादरम्यान तुफान व्हायरल झालं होतं.

या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी देखील उपस्थित होते. यावेळी आमदार राणा पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ते म्हणाले की, डॉ. पद्मसिंह पाटील यांनी काय काय काम केली आहेत ते सांगण्याची गरज नाही. विकास प्रक्रिया गेल्या काही दिवसांपासून ठप्प झाली आहे. आपल्या हक्काचे कृष्णानदीत खोऱ्यातील पाणी अजून मिळाले नाही, अशी यावेळी आमदार राणा पाटील यांनी खंत व्यक्त केली. डॉ. पद्मसिंह पाटील यांनी भाजपात पक्षांतर करण्याच्या घेतलेल्या निर्णयाबद्दल पुत्र राणा पाटील आणि कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

First Published on: August 31, 2019 5:31 PM
Exit mobile version