नागपूर: विद्यार्थिनीशी अश्लील कृत्य; आरोपीस जाळण्याचा प्रयत्न

नागपूर: विद्यार्थिनीशी अश्लील कृत्य; आरोपीस जाळण्याचा प्रयत्न

प्रातिनिधीक फोटो

नागपूर येथील इमामवाडय़ातील इंदिरानगर भागात खळबळजनक घटना घडली. ही घटना मंगळवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. शाळेच्या गाडीमध्ये सहा वर्षीय विद्यार्थिनीशी अश्लील कृत्य केल्याचा प्रकार समोर आला आहे. विद्यर्थिनीशी अश्लील कृत्य करणाऱ्या वाहन चालकाला नागरिकांनी रंगेहात पकडून चांगलाच चोप देऊन त्याच्या गाडीची चांगलीच तोडफोड केली. या प्रकरणानंतर चिडलेल्या नागरिकांनी त्या चालकाचे मुंडन करून त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला.

हे प्रकरण पोलिसांच्या लक्षात येताच पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करून चालकाला अटक केली आहे. या अटक केलेल्या चालकाचे नाव आशीष मनोहर वर्मा असे आहे.

असा घडला प्रकार

पीडित विद्यार्थिनी इयत्ता २री, तर तिचा १४ वर्षीय भाऊ इयत्ता ७वी मध्ये शिकतो. नेहमीप्रमाणे दुपारी वाहन चालक विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी जात होता. इंदिरानगर भागात व्हॅनमध्ये त्याने विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करायला सुरुवात केली. हा प्रकार रस्त्याने जाणाऱ्या एका तरुणीने बघितल्यानंतर तिने आरडाओरड करण्यास सुरूवात केली असता जवळील नागरिकांनी धाव घेतली. नागरिकांनी आशीष याला व्हॅनबाहेर काढून चांगलाच चोप दिल्यानंतर त्याचे मुंडन केले.

संतप्त नागरिकांच्या तावडीतून पोलिसांमुळे सुटका

दरम्यान संतप्त झालेल्या नागरिकांनी आशीष याला जिवंत जाळण्याच्या तयारीत होते. याचदरम्यान घटनेची माहिती इमामवाडा पोलिसांना मिळाल्यावर घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम.एम. साळुंखे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक ए.पी. जाधव ताफ्यासह तेथे पोहोचल्याने आशीषची संतप्त नागरिकांच्या तावडीतून सुटका झाली. पोलिसांनी त्याला उपचाराकरिता दाखल केले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

First Published on: July 10, 2019 12:57 PM
Exit mobile version