आठ दिवसानंतर पावसाचा मुंबईत कमबॅक

आठ दिवसानंतर पावसाचा मुंबईत कमबॅक

(फोटो प्रातिनिधिक आहे)

दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

आठ दिवसानंतर पुन्हा एकदा पावसाचे मुंबईत आगमन झाले असून पावसाच्या बारीक सरी पडू लागल्या आहेत. मुंबईसह सर्वच उपनगरीय भागातदेखील पावसाने हजेरी लावली. त्याचबरोबर कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यांमध्ये पावसाने कमबॅक केले. तर रत्नागिरीत मुसळधार पाऊस पडत असून काल रात्रीपासून मुंबईत मात्र रिपरिप पावसाला सुरुवात झाली आहे. त्याचप्रमाणे येत्या दोन दिवसात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज केंद्रीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

एक आठवडा मान्सून पुढे सरकणार

पावसाने आठ दिवसापूर्वीच हजेरी लावली होती. त्यानंतर पावसाने एक आठवडा विश्रांती घेतली. मात्र कालपासून पाऊस परत सुरु झाला असून येत्या दोन दिवसात पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दोन दिवस पाऊस पडल्यानंतर मात्र पुन्हा एकदा आठ दिवसांच्या सुट्टीवर जाणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. तर शनिवारी दक्षिण कोकणात पावसाच्या सरीचा जोर वाढणार असून रविवारी आणि सोमवारी मुंबईतही जोर वाढेल तर काही ठिकाणी मुसळधार सरीही येतील असे स्पष्ट करण्यात आले आहे. राज्याच्या इतर भागात पावसाच्या रिमझिम सरी बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

एक्झिटनंतर पावसाची पुन्हा एन्ट्री

पावसाने ८ जूनला राज्यात प्रवेश केला आणि ९ जून रोजी पाऊसाने मुंबईत जोरदार बॅटींग केली. परंतु या पावसाने पुन्हा एक्झिट घेऊन आज पुन्हा एकदा मुंबईत त्यांने आगमन केले. आता देखील हा पाऊस दोन दिवस मुंबईत राहणार असून पुन्हा एकदा आठ दिवसांकरता सुट्टीवर जाणार आहे. अशा प्रकारे मोसमी वाऱ्यात खंड पडणे फारसे दुर्मिळ नाही, असे मुंबई हवामानशास्त्र विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले आहे.

First Published on: June 16, 2018 3:14 PM
Exit mobile version