एका दिवसात ११ लाखांपेक्षा अधिक लसीचे डोस; दोन्ही डोस देण्यात महाराष्ट्र टॉपवर!

एका दिवसात ११ लाखांपेक्षा अधिक लसीचे डोस; दोन्ही डोस देण्यात महाराष्ट्र टॉपवर!

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत शनिवारी संध्याकाळी सात वाजेपर्यंत ११ लाख ९१ हजार ९२१ नागरिकांना लस देण्यात आली. राज्यात या लसीकरण मोहिमेत आतापर्यंत दिलेल्या एकूण डोसेसची संख्या ६ कोटी २७ लाखांवर गेली आहे. देशभरात उत्तरप्रदेश पाठोपाठ महाराष्ट्राने ही विक्रमी कामगिरी केली आहे. २१ ऑगस्ट रोजी राज्यात एकाच दिवशी ११ लाख ४ हजार ४६४ नागरिकांना लस देऊन महाराष्ट्राने आतापर्यतची सर्वाधिक संख्या नोंदविली होती. आज झालेल्या लसीकरण सत्रांमध्ये सायंकाळी सात वाजेपर्यंत ११ लाख ९१ हजार ९२१ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. रात्री उशिरापर्यंत या आकडेवारीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

लसीकरण कार्यक्रमातील हा आजपर्यंतचा विक्रम असून आरोग्य यंत्रणेतील सर्व घटकांच्या परिश्रमाचे हे फलित आहे, असे सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

लसींचे दोन्ही डोस देण्यात महाराष्ट्र टॉपवर!

महाराष्ट्रात आजपर्यंत एकूण ६ कोटी १५ लाख १६ हजार १३७ लसींचे डोस देण्यात आले असून त्यात दुसरा डोसही नागरिकांना देण्यात देशात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. कोविड प्रतिबंधक लसीकरणाच्या आज जारी केलेल्या एकत्रित अहवालानुसार महाराष्ट्रात १ कोटी ७१ लाख जणांना कोरोनाचा दुसरा डोस देण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसापासून देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासात कोरोनाच्या ४२ हजार ६१८ नवीन रुग्णांची भर पडली असून ३३० लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासात एकूण ३६ हजार ३८५ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्या आधी शुक्रवारी ४५ हजार ३५२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती तर ३६६ जणांना आपला जीव गमवावा लागला होता.


First Published on: September 4, 2021 8:49 PM
Exit mobile version