Maharashtra Rain: अतिवृष्टीचा ८९० गावांना तडाखा ७६ जणांचा मृत्यू, ५६ व्यक्ती बेपत्ता

Maharashtra Rain: अतिवृष्टीचा ८९० गावांना तडाखा ७६ जणांचा मृत्यू, ५६ व्यक्ती बेपत्ता

अतिवृष्टीनंतर निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीत कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील बाधित गावातील ९० हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. पुराचा ८९० गावांना तडाखा बसला असून या आपत्तीत ७६ जणांचा बळी गेला गेला तर ५६ व्यक्तींचा अजून ठावठिकाणा लागलेला नाही. गेल्या दोन दिवसात कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई उपनगर तर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा,  सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. अतिवृष्टीमुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊन ठिकठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मदत आणि पुनर्वसन विभागाने शनिवारी राज्यातील परिस्थितीबाबत माहिती दिली आहे.

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील ९ जिल्हे अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झाले आहेत. या नैसर्गिक आपत्तीत ३८ व्यक्ती जखमी झाल्या असून १६ घरांचे पूर्ण तर सहा घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. एनडीआरएफ आणि लष्कराच्या मदतीने बचाव कार्यास वेग आल्याची माहिती विभागाने दिली आहे.

महाड येथील परिस्थिती

अतिवृष्टीमुळे सावित्री नदीचे पाणी वाढून महाड आणि पोलादपूर येथे पूर आला आहे.
सावित्री नदीवरील पूल मोठ्या प्रमाणावर पाण्याखाली गेल्याने बचाव पथकांना वेळीच पोहोचणे अवघड झाले. एनडीआरएफच्या जवानांना हवाईमार्गे दुर्घटना स्थळी आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र सुरुवातीला अतिशय खराब हवामानामुळे ते उतरू शकले नाहीत. मात्र नंतर त्यांनी बचाव कार्य सुरु केले आणि माणगाव येथे बचाव केंद्रे सुरु करण्यात आली.

दोन कोटी रुपयांचा निधी  

राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून तातडीची मदत म्हणून २ कोटी रुपये देण्यात आले असून  पाऊस आणि पाणी ओसरल्याने मदत कार्यास वेग देण्यात आला आहे.


 

First Published on: July 24, 2021 7:21 PM
Exit mobile version