राऊत मला व माझ्या पतीला बंटी-बबली म्हणतात आणि त्रास देतात; नवनीत राणांचे दिल्ली पोलीस आयुक्तांना पत्र

राऊत मला व माझ्या पतीला बंटी-बबली म्हणतात आणि त्रास देतात; नवनीत राणांचे दिल्ली पोलीस आयुक्तांना पत्र

‘संजय राऊत मला व माझ्या पतीला बंटी-बबली म्हणतात आणि त्रास देतात’, असा राऊतांवर आरोप करत खासदार नवनीत राणा यांनी दिल्ली पोलीस आयुक्तांना पत्र लिहीलं आहे. नवनीत राणा आणि आमदार रवी राणा सध्या कोठडीत आहेत. मुंबईच्या खार पोलीस ठाण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्या विरोधात तक्रार केल्यानंतर नवनीत राणा यांनी थेट दिल्ली पोलिसांकडे राऊतांची तक्रार केली आहे.

राणा यांनी दिल्लीच्या पोलीस आयुक्तांकडे तक्रारीचं पत्रं दिलं आहे. राऊत यांनी आपल्याला 420 म्हणत बदनामी केल्याचा आरोप राणा यांनी केला आहे. राऊत यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. त्यामुळे राऊत यांची कोंडी होण्याची शक्यता आहे.

“मी मागासवर्गीय जातीची आहे. संजय राऊत वारंवार माझ्याविरोधात बोलतात. मी अनुसूचित जातीची सदस्य आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित होता. २०१४ मध्ये मी पहिल्यांदा शिवसेना उमेदवाराविरोधात निवडणूक लढवली. त्यानंतर शिवसेना उमेदवार, कार्यकर्ते मला धमकावू लागले. मी चांभार जातीची असल्यानं माझ्या जातीवरून खोटे आरोप करू लागले”, असं नवनीत राणा यांनी पत्रात लिहीलं आहे.

“२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला होता. तेव्हापासूनच संजय राऊत माझ्याविरोधात बोलत आहेत. शिवाय गेल्या दोन दिवसांत त्यांनी ‘मला आणि माझ्या पतीला बंटी आणि बबली’ असं म्हटलं. माझ्या समाजाला बदनाम करण्यासाठी त्यांनी मला आणि माझ्या पतीला ४२० देखील म्हटलं”, अशा शब्दांत राणांनी राऊतांची तक्रार केली आहे.

नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांच्या विरोधात शिवसैनिकांनी खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर राणा दाम्पत्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर राणा दाम्पत्यांना वांद्रे कोर्टात हजर करण्यात आले. त्यावेळी कोर्टाने या दोघांनाही 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. या दोघांच्या जामिनावर येत्या 29 तारखेला सुनावणी करणार असल्याचंही कोर्टाने सांगितलं. तसेच येत्या 27 तारखेपर्यंत सरकारी वकील आणि पोलिसांना त्यांचं लेखी म्हणणं मांडण्यास सांगितलं


हेही वाचा – हल्ल्या प्रकरणी चौकशी करण्यात येईल, राज्यपालांनी आश्वासन दिल्याचे सोमय्यांचे वक्तव्य

First Published on: April 27, 2022 2:25 PM
Exit mobile version